मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सध्या त्याच्या “ऑल मोस्ट प्यार विथ डीजे मोहाब्बत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतच अनुरागने एका वेब शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने आपल्या खाजगी आयुष्यासह विविध गोष्टींवर भाष्य केले. यावेळी अनुराग कश्यपने बॉलिवूड आणि हॉलिवूड मधील एक किस्सा देखील सर्वांशी शेअर केला.
मराठमोळ्या नाना पाटेकरांनी चक्क लिओनार्डोचा हॉलिवूड चित्रपट नाकारला असल्याचं अनुरागने यावेळी सांगितलं. लिओनार्डो डी कॅप्रियो हा हॉलिवूडचा सुपरस्टार आहे. या हॉलिवूड स्टार्ससोबत काम करण्याची संधी काही मोजक्याच अभिनेत्यांना मिळते आणि हीच संधी अभिनेते नाना पाटेकर यांना देखील मिळाली होती. मात्र, नानांनी ही संधी स्वतःहून नाकारली होती. याचा खुलासा अनुराग कश्यप यांनी केला आहे.
नानांच्या दमदार कामामुळे ऑस्कर विजेता रिडले स्कॉट देखील प्रभावित झाले होते. रिडले यांनी ‘द पूल’ चित्रपट पाहिला आणि मला इमेल केला. त्यांच्या आगामी बॉडी ऑफ लाइज सिनेमात मार्क स्ट्रॉंग या भूमिकेसाठी त्यांना नाना पाटेकरांना घ्यायचे होते. यावर नाना पाटेकरांनी ‘दहशतवाद्याची भूमिका आहे, ही भूमिका करणार नाही’ असे स्पष्ट सांगितले. असं स्वतः अनुराग यावेळी म्हणाला.
दरम्यान, ‘बॉडी ऑफ लाईज’ हा 2008 चा स्पाय थ्रिलर आहे ज्यात लिओनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो मुख्य भूमिकेत आहेत. मराठी रंगभूमी ते बॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाच्या गुणांनी, स्वभवामुळे नाना पाटेकरांनी आपली खास भूमिका मांडली आहे. तसेच, नाना पाटेकर यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या कलाकारांसोबतच्या वागणुकीबद्दल अनेक चर्चा रंगल्या असतात.