..अन्‌ काळजाचा ठोका चुकला

बीआरटी मार्गिकेबाबत उपाययोजना करण्याची मागणी

पुणे – पीएमपीच्या खराडी परिसरातील बीआरटी मार्गिकेत झालेल्या गंभीर अपघातामुळे प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला. आठवडाभराच्या कालावधीत बीआरटी मार्गात दुसऱ्यांदा अपघात झाल्याने, बीआरटी मार्गिकेबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

वारजे ते वाघोलीदरम्यान धावणाऱ्या बसचा सोमवारी सकाळी अपघात झाला. यानंतर ही बस पेटली. बीआरटी मार्गिकेत दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने भरधाव येत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालक संतोष माझिरे यांनी बस डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीची बसला समोरून धडक बसून, दुचाकी बसच्या पुढील उजव्या चाकाखाली अडकली. त्यानंतर बसने पेट घेतला, अशी माहिती पीएमपीच्या वतीने देण्यात आली.

खासगी वाहनांचा शिरकाव
अनेकदा वेळेची बचत करण्यासाठी खासगी वाहनचालक, विशेषत: दुचाकीचालक बीआरटी मार्गात शिरतात. मात्र, अतिवेग आणि ओव्हरटेक करण्यामुळे वाहनांची धडक होवून अपघात घडत आहेत. खासगी वाहनांना अटकाव करण्याबाबत प्रशासनाने परिपत्रक काढले होते.

वाहनांची घुसखोरी टाळण्यासाठी नव्याने कार्यान्वित झालेल्या सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गिकेत कर्मचारी तैनात केले आहेत. मात्र, पूर्वीपासून सुरू असणाऱ्या मार्गांत कर्मचारी नियुक्त केले नसल्याने वाहनचालक बिनधास्त ये-जा करत आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गांत कर्मचाऱ्यांचा अभाव, दुभाजक नसणे, सिग्नल कार्यान्वित नसणे आदी कारणांमुळे बीआरटी मार्गात अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

आठवड्याच्या आतच सलग दुसरा अपघात
सातारा रस्त्यावर रिक्षा आणि पीएमपीची बीआरटी मार्गात धडक झाली होती. या घटनेला आठवडा होण्यापूर्वीच खराडी येथील बीआरटी मार्गात दुसरा अपघात झाला आहे. मात्र, हा अपघात जीवावर बेतला आहे.

2016 मधील अपघाताची पुनरावृत्ती
8 मार्च 2016 मध्ये शिवाजीनगर कोर्टाच्या येथील रस्त्यावर अशाच प्रकारे अपघात झाला होता. तेव्हाही दुचाकी आणि बसचा अपघात होवून बसने पेट घेतला होता, अशी माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली. अशा अपघातांनी मात्र पुणेकरांत पीएमपीबाबत असुरक्षित भावना वाढत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.