चंडीगड – अलीकडच्या काळात विविध गोष्टींवरून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अभिनेत्री कंगनाने नुकतेच चार कोटी खर्च करून चौघा भावंडांना चंडीगडमध्ये अलिशान फ्लॅट भेट म्हणून दिले आहेत. बहीण रंगोली चंडेल, भाऊ अक्षत आणि अन्य दोन चुलत भावडांना तिने चार फ्लॅट भेट म्हणून दिले आहेत.
कंगना तिच्या भावंडांच्या पाठीशी नेहमीच उभी असते आणि त्यांना पाठबळ देते असे तिच्या जवळच्या नातेवाईकांचे मत आहे. तिने चौघांना भेट म्हणून दिलेले फ्लॅट हे चंदीगड विमानतळाजवळील उच्चभ्रूंच्या सोसायटीमध्ये आहेत. हा परिसर मोठे मॉल आणि रेस्टॉरंटससाठी ओळखला जातो आणि कायम गजबजलेला असतो.
नातेवाईकांच्या मते हिमाचल प्रदेशातील प्रत्येक व्यक्तीला आपले घर चंदीगडमध्ये असावे असे वाटत असते. त्यामुळेच कंगनाने तिच्या भावंडांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे.
हॉलीवुडमधील अभिनेता जॉर्ज कुलनीने अशीच त्याच्या 14 भावंडांना प्रत्येकी दहा लाख डॉलर भेट म्हणून एकदा दिले होते. कंगनाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या चौघा भावंडाना अलिशान फ्लॅट भेट दिल्याचे म्हटले जात आहे.
कंगनाने 2017 मध्ये तिच्या गुरूंना दक्षिणा म्हणून दोन कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट दिलेला आहे. तिचे योगगुरु सूर्य नारायणसिंग यांना तिने अंधेरी (पश्चिम) येथे ऐसपैस गॅलरी असलेली टू बीएचके सदनिका दिली. तिने त्यांच्याकडून योगाचे धडे घेतले आहेत.
कंगनाचा आता थलैवी हा प्रमुख चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यामध्ये तिने तमिळ चित्रपटसृष्टीतील एकेकाळाच्या अभिनेत्री, मुख्यमंत्री आणि प्रभावी नेत्या जे. जयललिता यांची भूमिका साकारलेली आहे. त्याचबरोबर तेजस, धाकड आणि मनकर्णिकाचा सिक्वेल येऊ घातलेला आहे.