…आणि मी ढग झाले

शेवटी ठरलं एकदाचं. नाही घरच्यांनी त्रासून ठरवलं… तिचं लग्न हो! तेही पावसाशी! पावसाच्या घरच्यांना काही ऑब्जेक्‍शनच नव्हतं. प्रॉब्लेम होता तिच्याच घरच्यांचा. म्हणे, जावयाचा मानपान कसा करायचा? त्याचं कोड कौतुक कसं करायचं? अर्थात तिच्याकडे कुठे होतं उत्तर? ती तर धुंदीत होती आपल्याच. बाबा मात्र शांत होते

म्हणे हिच्यापुढे काय बोलयचं? लेक लग्न करतेय हे काय कमी आहे का? छोटी भावंडं खुश होती, पावसात सहज खेळता येईल म्हणून. कुणाचं काय आणि कुणाचं काय? ती याच्या पलीकडे होते. वेगळीच नशा होती. पाऊस आता फक्त तिच्या मालकीचा असेल, हेच तिला माहीत होतं. पावसातच लग्न लावायचं हाही तिचा हट्ट. शेवटी दिवस तो उजाडला. त्याच्या घरची आणि तिच्या घरचीच लोकं उपस्थित राहणार होती. सगळी लोकं रेनकोटमध्ये आणि ती मात्र शालूचा नखरा करून उभी होती.

पाऊस तिच्याकडे मिश्‍किलपणे बघत होता. त्याला अप्रूप वाटत होतं तिचं आणि तिचा वेडेपणाही वाटत होतं. म्हणाला, “रेनकोट का नाही घातला?’ ती म्हणाली, “वेडाच आहेस.’ तो हसला. तो बरसत होता आणि ती मोहरून निघत होती, पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक. कैक फोटो आणि सेल्फी तिने पावसासोबत काढले होते. आता मात्र कुडकुडायला लागली होती. दमली होती. थंडी वाजायला लागली.

हे सगळं पाऊस बघत होता. अचानक तो बरसायचा थांबला. एव्हाना तिला ताप चढला होता. पावसानं हट्टाने तिला घरात घेतलं. दोन्हीकडची मंडळी तिचं वेड बघून तिला वेड्यात काढत होती. त्यानं सगळ्यांना शांत केलं. क्षणात झोपली ती. तिला गाढ झोपलेलं पाहून तो हळूच घराबाहेर निघाला. तिला अचानक जाग आली. तिनं त्याचा हात धरला, म्हणाली, “कुठे निघालास?’ तो म्हणाला, “माझ्या नेमून दिलेल्या कामावर; शेतकरी माझी वाट पाहताहेत. मी माझं काम नाही केलं तर लोक उपाशी मरतील. लोकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही. तिच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. म्हणजे तिच्या पावसावर माझा मालकी हक्कच नाही? तिला रागच आला. तो म्हणाला, “अगं, मी फक्त चार महिने तुझा नसेन. बाकी आठ महिने तुझ्याजवळच.’

तिला हे मान्यच होईना. तिने वाद घातला. “पण आताच तर मला तुझी गरज आहे…’ तो ऐकेचना. तो पहिल्याच दिवशी तिला सोडून गेला होता. चार दिवसांनी तो घरी आला…त्याच्यासाठी तिनं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती…
“प्रिय पाऊस… माझ्या जिवलगा… तुझा विरह मला सहन होण्यासारखाच नाही. माझ्यासारख्या अनेक मुली तुझ्या वेड्या आहेत. मला त्या वाटेकरी चालणारच नाही. त्यापेक्षा आपण मित्रांसारखं राहू. बंधनात अडकून पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून राहू या का? माझ्यापेक्षा शेतीला, शेतकऱ्यांना तुझी जास्त गरज आहे.पण माझ्या हाकेला कधीतरी ओ देऊन माझ्यासाठी बरसशील न? अच्छा येते. काळजी घे. जगाची काळजी करता करता स्वतःची काळजी घ्यायला विसरू नको.
तुझीच,

चिट्ठी वाचून पाऊस ढसाढसा रडला. तिच्या खिडकीबाहेर तो ढसाढसा रडत होता. तिला वाटलं तो त्या त्याची ड्युटी बजावत होता.

कॉलेजमध्ये असताना
पाऊस रोज माझी वाट बघायचा,
आणि वाट धरायचा…
वाटेत अडवायचा रोज..
किती धडधडायचं म्हणून सांगू..
सगळ्या मैत्रिणी चिडवायच्या…
हसायच्या आणि हेवाही करायच्या..
म्हणायच्या,काय नशीबवान आहेस…
मला कुठे कळत होतं प्रेम बिंम
मी नकार दिला हज्जारदा…
कायम दुस्वास केला…
तो आजही उभा राहतो माझ्यासमोर…
बोलत काहीच नाही….
काल जुनी मैत्रीण भेटली ,
सांगत होती हल्ली पाऊस बरसत नाही,
केवळ रडतो ढसाढसा…
माझ्या प्रेमात…
किती चर्रर्रर्र झालं म्हणून सांगू?
त्याच्यासाठी मी कुणाची झाले होते का?
पण सांगता आलं नाही
मी सोडले सगळे पाश
अनंतात विलीन झाले…
आणि मी ढग झाले…
सध्या आम्ही आभाळात
लिव्ह इनमध्ये राहतोय..
मी ढग आणि तो. माझ्या मालकीचा पाऊस!

– डॉ. प्राजक्ता कोळपकर 

Leave A Reply

Your email address will not be published.