शिक्षण सभापतींचे “ऑडिट’ : उपाययोजनांसाठी बोलविली तातडीची बैठक
– अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – मागील आठवड्यापासून महापालिकेच्या शिक्षण सभापतींनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सुरु केलेल्या शाळा पाहणी दौऱ्यामध्ये महापालिका शाळांमधील अनेक अडचणी आणि समस्या उघड झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याची दखल घेत शिक्षण सभापतींनी शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी, शिक्षण समितीची गुरुवारी (दि.28) तातडीची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीत शाळेतील स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिक्षण सभापतींनी केलेल्या शाळेच्या या “ऑडिट’मुळे तरी महापालिकेच्या शाळांची स्थिती सुधारेल अशी अपेक्षा पालक व शिक्षकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी होत असताना मात्र महापालिकेच्या शाळांची स्थिती दिवसें-दिवस खराब होत होती. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवूनही महापालिका शाळेतील पटसंख्या अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. शिवाय शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा व गुणवत्तेबद्दलही अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण सभापती मनिषा पवार यांनी शिक्षण समितीमधील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन महापालिकेच्या सर्व शाळेंना भेटी देऊन शाळेतील शिक्षण पद्धती व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सभापतींनी शाळेला दिलेल्या भेटीनंतर अनेक शाळांची सद्यस्थिती उजेडात आली असून शाळांमधील वर्गखोल्यामध्ये विद्युत सुविधा उपलब्ध नसणे, शाळेतील फर्निचर, बेंच, स्वच्छतागृह, टॉयलेट तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशामक यंत्रणाही सुस्थितीत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
याबरोबरच अनेक शाळांमध्ये लाखो रुपये खर्च करुन बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, या सर्व बाबींची गंभीर दखल घेत सभापती मनीषा पवार यांनी शिक्षण समितीची बैठक बोलवली असून या बैठकीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. शिक्षण समितीच्या बैठकीत या सर्व बाबी मांडण्यात येणार असून तातडीने या सुविधा शाळेत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मनीषा पवार यांनी सांगितले आहे.
मागील काही वर्षांपासून महापालिका शाळेची घटती पटसंख्या तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधेवंरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात होत. मात्र, मनीषा पवार यांनी महापालिका शाळेंचा पाहणी दौरा काढून शाळेतील समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या मार्गी लावण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नामुळे आता तरी महापालिकेच्या शाळेच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नऊ शाळांमध्ये विद्युत व्यवस्थेचा बोजवारा
शिक्षण सभापती मागील आठवड्यापासून शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षण समितीच्या सदस्यांसमवेत महापालिका शाळेची पाहणी करीत आहेत. यामध्ये 9 शाळांमध्ये विद्युत व्यवस्था दुरुस्ती व विद्युत व्यवस्था उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. शौचालय व्यवस्था नाही किंवा शौचालयाची संख्या कमी असलेल्या आठ शाळा असल्याचे समोर आले आहे.
16 शाळांमधील अग्निशामक यंत्रणेची स्थिती खराब
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या 16 शाळांमध्ये अग्निशामक यंत्रणेची स्थिती खराब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी 13 शाळंमध्ये अग्निशामक यंत्रणाच कार्यान्वित नाही तर दोन शाळांमधील अग्निशामक यंत्रणेची दुरुस्ती आवश्यक आहे. तसेच एका शाळेतील अग्निशामक यंत्रणेची मुदत संपलेली आहे.
मागील काही दिवसापासून आम्ही दररोज चार ते पाच शाळांना भेट देत असून शाळेची सद्यस्थिती व विद्यार्थ्यांना नेमक्या काय सुविधा मिळत आहेत, याची माहिती घेत आहेत. सर्व शाळांची माहिती जमा केल्यानंतर आवश्यक त्या बाबी तातडीने उपलब्ध करुन देणार आहोत. त्यासाठी, दोन दिवसांत शिक्षण समितीची बैठकही बोलवण्यात आली आहे. शिक्षण समितीच्या बैठकीत शाळांमध्ये आवश्यक असणाऱ्या बाबी उपलब्ध करुन घेण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर या सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
– मनीषा पवार, सभापती, शिक्षण मंडळ पिंपरी-चिंचवड महापालिका