पिंपरी – पायातील खुबा निकामी झाल्याने पुढील आयुष्य आता दिव्यांग म्हणून जगावे लागते की काय, या भीतीने ग्रासले असताना इंदिरानगर-चिंचवड येथील मिलिंद कांबळे यांना मदतीचा हात मिळाला. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया होऊ शकली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. यासाठी महत्त्वपूर्ण माध्यम ठरलेल्या अमित गोरखे यांनी फडणवीस शहरात आले असताना कांबळे यांची भेट घालून दिली. यावेळी कांबळे यांना आनंदाश्रू अनावर झाले.
दीड वर्षांपूर्वी कांबळे यांच्या उजव्या पायातील खुबा निकामी झाला. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारासाठी निगडीतील खासगी रूग्णालयात त्यांना सुमारे साडेचार लाख रुपये खर्च सांगितला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने एवढी रक्कम त्यांना भरणे शक्यच नव्हते. जर वेळीच शस्त्रक्रिया केली नसती तर त्यांचा उजवा पाय कापावा लागणार होता. अशा परिस्थितीत त्यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अमित गोरखे यांची भेट घेतली.
गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन कांबळे यांना दिले. गोरखे हे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. त्यानंतर फडणवीस यांनी त्वरीत फोन करून संबंधित विभागाला कोणत्याही परिस्थितीत ही शस्त्रक्रिया मोफत करून घेण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यासाठी मदत करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर निगडीतील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे कांबळे हे पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहू शकले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षांपूर्वी माझी व्यथा ऐकून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली. त्यामुळे मी स्वत:च्या पायावर उभा राहू शकलो. पिंपरी-चिंचवड दौऱ्यात ते आले असताना त्यांची भेट घेऊन मी त्यांना आभार पत्र दिले. तसेच, एक पेन भेट दिला. त्यांनी तो स्वीकारत माझी विचारपूस केली. त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना करताना मला काही क्षणासाठी अश्रू आवरले नाही.
– मिलिंद कांबळे, इंदिरानगर.