…अन्‌ ईश्‍वराच्या दर्शनासाठी चक्‍क मगर

थिरूवनंतपुरम- कसरगोड येथील श्री अनंतपद्मनाभ स्वामी देवालयात बबिया नावाच्या मगरीने मंगळवारी काही काळ आश्‍चर्यकारकरित्या वास्तव्य केले. त्यानंतर प्रमुख पुजाऱ्याने विनंती केल्यानंतर तिने देवालयाच्या तळ्यात आपला मुक्काम हलवला.

देवालयाचे मुख्य पुजारी चंद्रप्रकाश नांबिसन यांनी बबियाला तिच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे देवालयाच्या तलावात जाण्याचे आदेश दिल्यावर तिने आपला मुक्काम हलवला, असे देवालयाचे अधिकारी चंद्रशेखरन यांनी सांगितले.

ही दैवी मगर शाकाहारी असल्याचे मानले जाते. ती देवस्थानचा गूळ आणि भातापासून बनवलेला प्रसाद केवळ भक्षण करते. ती कोणालाही अगदी तलावातील माशांनाही हानी पोहोचवत नाही. या तलावात ती 73 वर्षापासून राहात असल्याचे सांगण्यात येते. ती देवालयाचे रक्षण करते असे मानण्यात येते.

1945 मध्ये एका ब्रिटिश सैनिकाने बबियावर गोळी झाडली. त्याच्या पुढच्या सेकंदाला त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी बबिया देवालयात दिसली. ती येथे कशी आली याची कोणालाही कल्पना नाही. तसेच तिचे बबिया हे नाव कोणी ठेवले याची माहिती कोणालाही नाही, असे देवालयाच्या पुजाऱ्यांनी सांगितले.

देवतांची पूजा झाल्यावर मंदिराचा प्रसाद बबियाला दिला जातो. पुजाऱ्यांनी हाक मारल्यावर ती तलावाच्या बाहेर येते. बबियाचे मंदिराच्या आवारातील हे फोटो मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांत व्हायरल होत आहेत.

हे देवालय अनंतपुरा या छोट्या गावात आहे. येथे अनेक भाविक देवाची प्रार्थना केल्यानंतर तलावाचीही प्रार्थना करतात. हे देवालय पद्मनाभस्वामींचे मूळ स्थान असल्याचे मानण्यात येते. भगवान पद्‌नाभ आणि भगवान विष्णू यांची संवादक असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.