…आणि तब्बल 32 वर्षांनंतर स्वीडनहून पुण्यामध्ये आलेल्या नेहा भेटली सख्ख्या बहिणीला

स्वीडनमधील दाम्पत्याने घेतले होते दत्तक; जन्मदातीचे मात्र निधन

पुणे – “स्त्रीवत्स’ या सामाजिक संस्थेमध्ये 1986 साली एक लहान मुलगी दाखल झाली.. तिला स्वीडनच्या एका दाम्पत्याला दत्तक देण्यात आले..तिला काही वर्षांनंतर दत्तक घेतल्याचे सांगितले.. मागील 10 वर्षे तिचा शोध सुरूच होता.. अखेरीस तिच्या सख्ख्या बहिणाचा संपर्क झाला..त्या “दोघीं’ची तब्बल 32 वर्षांनंतर भेट झाली आणि ती म्हणाली “हॅपी टू सी हर’. ही कहाणी आहे, बहिणीची भेट घेण्यासाठी स्वीडनहून पुण्यामध्ये आलेल्या नेहाची.

लहानपणी आईने स्वीडनमधील एका दाम्पत्याने दत्तक घेतलेली नेहा स्वीडनमध्येच स्थित असून पेशाने ती नर्स आहे. त्या दाम्पत्याने दत्तक घेतल्याचे सांगितल्यावर तिने तिच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांवरुन आईचा शोध सुरू केला. शोध घेत असताना तिला “कायाकल्प’ संस्थेच्या सीमा वाघमोडे यांच्याशी संपर्क झाला. वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या परिवर्तनासाठी काम करणाऱ्या वाघमोडे यांनीही तिला मदत केली. त्यानंतर त्यांनी नेहाला पुण्यात बोलावले. कागदपत्रांवरुन त्या दोघी बहिणी असल्याचे सिद्ध झाले आणि त्या दोघींनी भेटून आनंद व्यक्त केला.

“नेहाला भेटून आनंद झाला. नातेवाईकदेखील संपर्क साधत नाहीत. बहीण हयात नसल्याचे आईने सांगितले होते. मात्र, ती आज भेटली, याचा आनंद आहे. विशेष म्हणजे आपले कोणीतरी आहे, याचा जास्त आनंद आहे. तिच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, तिने सुखी आणि समाधानी असावे, हीच अपेक्षा आहे,’ अशी प्रतिक्रिया नेहाच्या पुण्यातील बहिणीने व्यक्त केली.

नेहा आणि तिच्या बहिणीची भेट घडवून आणता आली, याचे समाधान आणि आनंद आहे. 10 वर्षे नेहा सातत्याने आईचा शोध घेत होती. त्यानंतर तिने मला नोव्हेंबर 2018 मध्ये संपर्क साधला. सुदैवाने लवकरच मला तिची बहीण सापडली. त्यानंतर नेहाला तिची बहीण पुण्यात आहे, हे सांगितल्यानंतर तिला आनंद झाला. परंतु, दुर्दैवाने तिच्या आईचे 10 वर्षांपूर्वी निधन झाल्याने तिची भेट होऊ शकली नाही. दि.28 रोजी नेहा पुण्यात आली.
– सीमा वाघमोडे, “कायाकल्प’ संस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)