न्यायालय इमारतीच्या खोदकामातील प्रकार
जुन्नर – जुन्नरमध्ये शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय कार्यालये आणि न्यायालयाच्या परिसरात नूतन न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू असून या कामाच्या खोदकामात प्राचीन गणेशमूर्ती आढळली आहे. या परिसराला पूर्वी दादोजी कोंडदेव वाडा अशीही ओळख असून या 10 ते 15 एकराच्या आवारात सुमारे 15 गढी आहेत. दुर्लक्षित असलेल्या या 40 ते 50 फुट उंचीच्या मातीच्या व काही वीट बांधकामातील गढींना जोडणारी दगडी तटबंदी अजूनही भक्कमपणे उभ्या आहेत.
ब्रिटिशकालीन गॅझेटमध्ये या गढीचा उल्लेख सिटी फोर्ट, असा लिखित स्वरूपात आढळतो. आता ज्या ठिकाणी ब्रिटीश काळातील न्यायालयाची इमारत उभी आहे, त्या ठिकाणी मराठेशाही किंवा पेशवे काळात श्रीगणेशाचे मंदिर असावे, असा अंदाज आहे. या ठिकाणी एक दगडी बांधकामातील कोरडी पडलेली विहीर आहे.
जुन्नर परिसरात अनेक वर्षे मोगलांची सत्ता होती. जुन्नर परिसरात यापूर्वीही अनेकदा खोदकाम करताना देवतांच्या मुर्त्या सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.
… अशी आहे मूर्ती
करड्या रंगाच्या पाषाणात बनविलेली ही मूर्ती अडीच फूट उंचीची आहे. डावीकडे सोंड व उजवीकडे मोठ्या आकाराचा दंत अशी ही चतुर्भुज आसनस्थ मूर्ती असून सोंड इतर मूर्त्यांपेक्षा थोडी लांब आहे. न्यायालयाच्या परिसरातच या प्राचीन गणेशमूर्तीची स्थापना करून मंदिर उभारावे, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.