या महिन्यात करण जोहर निर्मित “स्टुडंट ऑफ द ईयर 2’ला प्रदर्शित होवून एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री अनन्या पांडेच्या पदार्पणासही एक वर्ष होईल. याबद्दल बोलताना अनन्या पांडे म्हणाली, मला अजूनही हे एक स्वप्न वाटत आहे. त्याचे वर्णन करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग असेल. माझा अजूनही यावर विश्वास होत नसून मी खूपच रोमांचित आहे. मी आता एक अभिनेत्री असल्याचा मला आनंद आहे.
तसेच प्रेक्षकांनी तिला खूप प्रेम दिल्याचेही ती कबूल करते. याविषयी अनन्या पांडे म्हणाली, तरुण पिढी मला पाहात आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही माझयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीपेक्षा मला हे महत्त्वाचे वाटते, असे तिने सांगितले.
तसेच शकून बत्रा दिग्दर्शित चित्रपटात अनन्या पांडे भूमिका साकारणार आहे. यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. याचे वर्णन करताना अनन्या म्हणाली, शकुनचे नाव ऐकताच मी या चित्रपटाला होकार दिला. मी त्यांना सांगितले की जर ते दिग्दर्शन करणार असल्यास मी काहीही करण्यास तयार आहे. मी तिथे एका विद्यार्थ्याप्रमाणे बसण्यास तयार आहे आणि मला जमेल तितके त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करेन, असे तिने सांगितले. दरम्यान, अनन्या पांडेने आतापर्यत दोन चित्रपटात काम केलेले आहे. तिने कार्तिक आर्यनसोबत “पती, पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रीमेकमध्ये निर्णायक भूमिका साकारली होती.