अनेय कोवलमुडी आणि धनश्री पवार यांना विजेतेपद

प्लेयर्स कप जिल्हा मानांकन सबज्युनियर टेबल टेनिस स्पर्धा
पुणे: मुलींच्या गटात अग्रमानांकित धनश्री पवार ने तिसऱ्या मानांकित मयुरी ठोंबरेचा तर मुलांच्या गटात अनेय कोवलमुडीने तिसऱ्या मानांकित आदी फ्रॅंक अग्रवालचा पराभव करत येथे होत असलेल्या 19वी प्लेयर्स कप जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या सबज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले.

यावेळी झालेल्या स्पर्धेतील मुलींच्या गटातील उपान्त्यफेरीत अग्रमानांकित धनश्री पवारने पाचव्या मानांकित आनंदिता लुनावतचा 11-13, 11-8, 11-7, 11-7, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिमफेरीत प्रवेश निश्‍चित केला. या सामन्यात आनंदिताने पहिला सेट जिंकत धक्‍कादायक निकाल लागण्याची शक्‍यता निर्माण केली होती. मात्र, धनश्रीने पुनरागमन करत सामना आपल्या नावे केला. तर, दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या मानांकित मयुरी ठोंबरेने द्वितिय मानांकन प्राप्त राधिका सकपाळचा धक्‍कादायक पराभव करत अंतिम फेरी गाठली. यावेळी सामन्यात मयुरीने राधिकाचा 10-12, 12-10, 9-11, 11-7, 11-8, 3-11, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिम फेरी गाठली.

तर, अंतिम फेरीत अग्रमानांकित धनश्री पवारने तिसरे मानांकन असणाऱ्या मयुरी ठोंबरेचा 11-9, 11-8, 11-8, 6-11, 11-9 असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. यावेळी सामन्यात धनश्रीने मयुरीवर वर्चस्व गाजवत सामना एकतर्फी जिंकणार अशी शक्‍यता निर्माण केली होती. मात्र, चौथ्या सेटमध्ये मयुरीने जोरदार पुनरागमन करत चौथा सेट आपल्या नावे करत सामन्यात रोमांच निर्माण केला होता. यानंतर धनश्रीने पुन्हा अखेरचा सेट जिंकत सामना आपल्या खिशात घातला.

तर, मुलांच्या गटातील उपान्त्यफेरीत अग्रमानांकित अनेय कोवलमुडीने पाचवे मानांकन असणाऱ्या जय पेंडसेचा 11-7, 11-3, 11-8, 11-2 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या मानांकित आदी फ्रॅंक अग्रवालने दुसऱ्या मानांकित सनत जैनचा 6-11, 11-6, 11-9, 11-9, 11-7 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. यावेळी सनतने पहिला सेट जिंकून आदीवर दबाव आणला होता. मात्र, आदीने जोरदार पुनरागमन करत सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, अंतिम सामन्यात अनेयने आदीचा 11-7, 11-7, 11-9, 11-8 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. यावेळी अनेयने आदीला पुनरागमनाची कोणतीही संधी न मिळू देता सामन्यात विजय मिळवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)