जयपूर – भारतीय क्रिकेटला येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आणखी एक मोठे मैदान उपलब्ध होणार आहे. भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे अद्ययावत क्रिकेट मैदान जयपूरमध्ये साकार होत आहे.
कोलकत्यातील इडन गार्डननंतर अहमदाबादमध्ये एक मैदान तयार झाले. कोलकत्यातील मैदानावर 90 हजार प्रेक्षक क्षमता आहे. अहमदाबादमधील मैदानावर 1 लाख प्रेक्षक क्षमता आहे. आता जयपूरमध्ये चौम्प गावातील जवळपास 100 एकर जमिनीवर हे नवे मैदान आकार घेत आहे. या मैदानाची प्रेक्षक क्षमता 75 हजार असून हे देशातील तिसरे मोठे मैदान ठरणार आहे. प्रत्यक्ष मैदानावर 4 मुख्य खेळपट्ट्या असून सरावासाठीही मैदानात तसेच नर्सरी ग्राउंडवर दोन्ही बाजूंना खेळपट्ट्या तयार करण्यात येत आहेत.
तसेच जागतिक स्तरावर खेळाडूंना ज्या सुविधांची गरज असते त्या सर्व येथे उपलब्ध होत आहेत. राजस्थान क्रिकेट संघटनेला हे मैदान तयार करण्यासाठी जवळपास 350 कोटी रुपये खर्च आला आहे. शहरातील हे दुसरे क्रिकेट मैदान ठरणार आहे. बीसीसीआय येत्या काळात हे मैदान उपलब्ध झाल्यानंतर सर्व स्तरावरचे सामने आयोजित करू शकते.