यंदा गणरायाची आरास महागली ; साहित्यांनी बाजारपेठ सजली
कराड – गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले असून घरगुतींसह विविध गणेश मंडळांनी सजावटीला प्रारंभ केला आहे. गणरायाच्या सजावटीसाठी विविध मखरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. आरास व सजावटीचे साहित्य हौसेने खरेदी करण्यासाठी ग्राहक दिसत आहेत. मात्र सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा आरास महागल्याचे चित्र आहे.
गणेश आगमन दोनच दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल होऊ लागली आहे. महापूर व मंदीचे सावट गणेशोत्सवावर असले तरी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोणतीही उणीव राहू नये, यासाठी भक्त दक्षता घेत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आरास करताना मखमली टिकली वर्कचे पडदे, कापडी मांडव, कागदी आसने, मंदिरे व फुलोरा, गणरायासाठी छत्र तसेच पेशवाई, पुणेरी आणि शिंदेशाही पगड्या यांना मोठी मागणी आहे. कापडी मंडप व स्क्रीन पेंटिंगची आसने यासह तरंगते दिवे, रांगोळी यांना महिलांची पसंती मिळत आहेत.
माळा, डमरू माळ, चेरी लाईट, एलईडी इंडियन या अवघ्या 50 ते 350 रुपये बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तसेच कागदी मखरे, फायबर मखरे, गौरीकमळ, फुलोरा, सिंहासन यांना नेहमीप्रमाणे मागणी असून 200 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत.
गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे, साड्या व दागिन्यांच्या खरेदीसाठी महिलांची दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गौरी सजावटीचा ट्रेंड रुजला असून तयार गौरी नेण्याकडे महिलांचा कल आहे. एकंदरीत गणरायाच्या स्वागतासाठी गणेश मंडळांनीही कंबर कसली असून विविध प्रकारच्या सजावटी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.