संगमनेर, (प्रतिनिधी) – वर्णव्यवस्थेमुळे समाज जाती व्यवस्थेत विभागला गेला होता. मात्र, या सर्वांना मानवता या धर्मातून एकत्र आणण्याचे काम संतांच्या समानतेच्या विचारांनी केले.
समतेच्या विचारांची हीच परंपरा घेऊन काँग्रेस पक्ष काम करत असून युवक काँग्रेस या व्यासपीठावरून तरुणांना समाजकारण राजकारणासह सर्व क्षेत्रात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
त्यांनी संत साहित्य ते आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारणातील सर्व पक्षांचा प्रवास तरुणांपुढे उलगडला.
सहकारमहर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या प्रांगणात शहर व ग्रामीण युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुभाष सांगळे, सचिन खेमनर,
शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा,ॲड.नानासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष गोरख घुगे, हर्षल राहणे, अमित गुंजाळ, वैष्णव मुर्तडक, गोपी जहागीरदार आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, इडी,सीबीआय,प त्रकारिता, न्यायालय यासारख्या स्वायत्त संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तींना तुरुंगात घातले जात आहे.
आता भाजपला भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. तरुणांनी स्वतःचे कुटुंब व्यवसाय सांभाळून राजकारण व समाजकारणात सहभाग घ्यावा. चांगल्या व्यक्तींची राजकारणात गरज असून युवक काँग्रेसमुळे अनेकांना संधी मिळत आहे.
युवकांनी इतरांशी संवाद साधा .सकारात्मक वाचन करा. चांगल्या लोकांशी मैत्री करा, असे सांगताना देशहिताचा काँग्रेसचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले.
डॉ.जयश्री थोरात, मिलिंद कानवडे, ओंकार बिडवे, योगेश खेमनर, रुपेश राहणे, आशिष वर्पे, स्वाती राऊत, प्राजक्ता घुले, विजय उदावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहर व ग्रामीण युवक काँग्रेसमधील कार्याध्यक्ष, महासचिव, सरचिटणीस यांचा विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ झाला. या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील युवक व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.