भुईज – वेळे, ता. वाई येथून गुळुंबकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेळे गावालगत नवीन पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या भिंतीवर काल (दि. 22) सायंकाळी दुचाकी (एमएच-11-एएन-8222) धडकून झालेल्या अपघातात प्रमोद गंगाराम यादव (वय 20, रा. यशवंतनगर, वाई) आणि प्रथमेश संतोष खैरे (वय 21, रा. वाई) यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुढीपाडव्याला (दि. 22) रात्री 8.30 च्या सुमारास प्रमोद यादव आणि प्रथमेश खैरे हे दुचाकी (एमएच-11-एएन-8222) वरून वेळे येथून गुळुंबकडे जात असताना, त्यांना तेथे सुरू असलेले पुलाचे बांधकाम दिसले नाही. त्यांची दुचाकी पुलाच्या भिंतीवर आदळून दोघेही खाली पडले. या अपघाताची माहिती मिळताच वेळे ग्रामस्थांनी मदतकार्य करून, दोघांना कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले. तेथे एक जण आधीच मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले.
दुसऱ्या गंभीर जखमीला सातारा येथे पाठवण्यात आले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रमोद यादव हे दुचाकी चालवत होते, तर प्रथमेश खैरे हे मागे बसले होते. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून, सपोनि रमेश गर्जे तपास करत आहेत.