नवरा बायकोच्या नात्यात उभारली प्रॉपर्टीने अदृश्‍य भिंत

– संदीप घिसे

पिंपरी – त्यांच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले होते. राजा-राणीचा संसार सुखात सुरू होता. मात्र त्यांच्या या सुखाला कोणाचीतरी नजर लागली. दोघांमध्ये प्रॉपर्टीने अदृष्य भिंत निर्माण केली. सणावारांच्या निमित्ताने माहेरी गेलेली पत्नी वारंवार बोलाविणे धाडूनही पुन्हा सासरी येण्याचे नावच घेत नव्हती. यामुळे कंटाळलेल्या पतीने पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडे अर्ज केला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही अदृष्य भिंत दूर केल्याने आता “त्यांचा’ सुखाचा संसार सुरू झाला आहे.

शहरात राहणाऱ्या अनंतचे लग्न मार्च 2019 मध्ये साताऱ्यातील कल्पनाशी (काल्पनिक नावे) झाले. लग्नानंतर त्यांचा संसार सुखात सुरू होता. कल्पनाची आई लहानपणीच वारल्याने वडिलांनी दुसरे लग्न केले. यामुळे कल्पनाचा सांभाळ काका, काकी आणि आजीने केला. कल्पनाला कधीही आईची कमी भासू दिली नाही. कल्पना देखील लहानपणापासून मेहनती होती. नारळाच्या बागेतील नारळ विकून तिने आपल्या परिने काका काकीच्या संसाराला हातभार लावला. यात्रेनिमित्त गावी गेलेली कल्पना पतीची परवानगी घेऊन काही दिवस माहेरी राहिली. मात्र कित्येक दिवस उलटूनही ती पुन्हा सासरी येण्याचे नाव घेत नव्हती. यामुळे कल्पनाच्या काकाला वारंवार फोन करून तिला पुन्हा नांदायला येण्यास भाग पाडले. पुन्हा नागपंचमीला कल्पना माहेरी गेली. ती परत येत नसल्याने पतीने वारंवार पुन्हा तिच्या काकाला फोन केले. मात्र यावेळी ही युक्‍तीही कामी आली नाही.

पत्नी माहेरहून येत नसल्याने अखेर पतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील महिला सहाय्य कक्षाकडे अर्ज केला. पोलीस उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि पोलीस कर्मचारी अनिता जाधव यांनी कल्पनाला तिच्या काका काकीसह बोलावणे धाडले. पोलिसांचे बोलावणे येताच ते तिघेही हजर झाले. महिला सहाय्य कक्षातील समुपदेशक संध्या जाधव यांनी राणीला विश्‍वासात घेत सासरी नांदायला येत नसल्याबाबतचे कारण जाणून घेतले. मात्र तिने सासू-सासरे मुलीप्रमाणे जीव लावतात. पतीही खूप प्रेम करीत असल्याचे सांगितले. मात्र पतीचे बोलावणेच आले नसल्याचे तिने सांगितले. सर्वांशी चर्चा केल्यावर काका आणि काकीने पती अनंतचा निरोप पत्नी कल्पनाला दिला नसल्याची बाब समोर आली. असे करण्यामागचे कारण जाणून घेतल्यावर अनंत आणि कल्पनाला धक्‍काच बसला.

गावाकडे कल्पनाच्या नावावर वडिलांची काही प्रॉपर्टी होती. कल्पना जर आपल्याजवळच राहिली तर तिची प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. याशिवाय तिचा संसार मोडल्यास तिच्या पतीकडूनही काही लाख रुपये मिळतील. तसेच घरातील काम करायला आयती एक कामवाली मिळेल, असा हेतू तिच्या काका काकीचा होता. त्यामुळे त्यांनी अनंत सासरी बोलवित असून तो वारंवार कल्पनाला फोन करीत असल्याचे तिला सांगितले नव्हते. समुपदेशक आणि पोलिसांनी कल्पनाची योग्य प्रकारे समजूत घातली.

यामुळे अनेक महिन्यांपासून माहेरी असलेली कल्पना पुन्हा आपल्या अनंतकडे राहू लागली. आता त्या दोघांचा संसार सुखात सुरू आहे. यामुळे आपल्या संसारात इतरांना किती ढवळाढवळ करू द्यायची आणि त्यांना किती महत्व द्यायचे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. संसारातील निर्णय आपल्या जोडीदाराशी बोलूनच दोघांनी मिळूनच घेतलेला बरा.

संसारच्या वेलीवर अनेकदा पती आणि पत्नीमध्ये गैरसमजुतीतून वाद निर्माण होतात. गैरसमज योग्यवेळी दूर न झाल्यास वाद विकोपाला जातात. काही घटनांमध्ये घटस्फोट होतो तर काही ठिकाणी अगदी टोकाचीही भूमिका घेतली जाते.

अनेकदा घटस्फोटानंतर मुलांचे भवितव्य काय, याचाही विचार केला जात नाही. पतीच्या विरोधात विवाहितेचा छळ हा गुन्हा दाखल करण्यापूर्वी महिला सहाय्य कक्षाकडून समुपदेशन केले जाते. यामध्ये गैरसमज दूर करून संसार जुळविण्याचा प्रयत्न केला जातो. यात बहूतांशवेळा यश मिळतेच असे नाही. तरीही उसवलेल्या या नात्यांना विश्‍वासाची शिलाई घालण्याचे काम पोलीस करतात. अशाच यशस्वी निवडक काही घटना दैनिक प्रभात दर सोमवारी प्रसिद्ध करणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.