काश्‍मिरमधील परिस्थितीबाबत आंतरराष्ट्रीय तपास करावा

पाकिस्तानची संयुक्‍त राष्ट्र मानवाधिकार परिषदेकडे मागणी

जिनिव्हा – काश्‍मीरमधील परिस्थितीसंदर्भात आंतररष्ट्रीय पातळीवर तपास करावा, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेकडे केली. भारताने जम्मू काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर जागतिक समुदायाने अलिप्त राहू नये, अशी आग्रही मागणीही पाकिस्तानने केली आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या मानवी हक्क विषयक 42 व्या परिषदेमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने जागतिक व्यासपिठावर काश्‍मीरच्या मुद्दयावरून निष्क्रीय राहू नये, असे म्हटले.

काश्‍मीरच्या जनतेला न्याय आणि सन्मान मिळावा यासाठी जागतिक मानवाधिकार परिषदेकडे आपण दाद मागत आहोत, असे कुरेशी म्हणाले. भारताने पॅलेट गनचा वापर करणे ताबडतोब थांबवावे, संचारबंदी, प्रसार माध्यमांवरील निर्बंध उठवावेत, मूलभूत स्वातंत्र्य अबाधित राखवे, राजकीय नेत्यांची सुटका करावी आणि संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे पलन करावे. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मानवी हक्कांचे पालन करावे यासाठी परिषदेने भारताला सूचना कराव्यात अशी मागणी कुरेशी यांनी केली.

पाकिस्तान हा मानवाधिकार परिषदेचा संस्थापक सदस्य आहे. भारताकडून होत असलेल्या मानवाधिकारांच्या पायमल्लीला रोखणे ही नैतिक आणि सैद्धांतिकदृष्ट्या पाकिस्तानला आवश्‍यक वाटते. या संदर्भात आपण निर्णायक आणि ठाम कृती करायला हवी. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने शिफारस केल्यानुसार काश्‍मीरमधील परिस्थितीची चौकशी समिती नियुक्‍त करण्यात यावी, असे त्यांनी परिषदेला सांगितले.

काश्‍मिरी लोकांना मूलभूत आणि अविभाज्य मानवी हक्कही नाकारले जात आहेत, असा आरोपही कुरेशी यांनी केला. नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण करणे शक्‍य होत नसून राजकीय नेत्यांना स्थानबद्ध केले गेले आहे. भारताची ही कृती आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. 370 कलम रद्द करणे आणि दोन केंद्रशासित प्रदेशात काश्‍मीरचे विभाजन करण्याचा भारताचा एकतर्फी निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचा आरोपही कुरेशी यांनी केला.

भारताने गेल्या महिन्यात जम्मू काश्‍मीरसाठीचे 370 कलम रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून थयथयाट झाला आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेक बेजबाबदार विधाने करून भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)