नवऱ्याने टाकून दिलेल्या महिलेचा झाडूकाम ते अधिकारीपर्यंत प्रेरणादायी प्रवास

जोधपूर महापालिकेतील आशा कांडरा यांचा प्रेरणादायी प्रवास

जोधपूर – जोधपूर महानगरपालिकेत झाडूकाम करणाऱ्या आशा कांडरा म्हणजे तणावात आणि निराशेत असणाऱ्या महिला आणि तरुण-तरुणींसाठी जितेजागते प्रेरणास्थान आहेत.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आई-वडील आणि मुलांचा सांभाळ करत चिकाटीने अभ्यास करून त्यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले

असून ज्याठिकाणी इतक्या दिवस त्या झाडलोट करण्याचे काम करत होत्या त्या महानगरपालिकेच्या महापौरांनी त्यांच्या यशाबद्दल सत्कार केला आहे.

आशा कांडरा यांचे लग्न झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत त्याच्या पतीने त्यांना सोडून दिले. शिक्षण नसल्याने त्यांनी दोन मुले आणि आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी जोधपूर महानगरपालिकेच्या सफाई विभागात झाडलोट करण्याची नोकरी स्वीकारली.

तिथे अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असे. नवऱ्याने सोडून दिलेली म्हणून तसेच त्यांच्या जातीवरून अपमान केला जात असे. त्यांनी वरीष्ठांना काही चांगल्या गोष्टी सुचवल्या किंवा मागण्या केल्या तर तू काय कलेक्टर आहेस का, अशा शब्दात त्यांचा पाणउतारा केला जात असे.

मनावर वर्मी घाव घालणारी अशी वाक्ये त्यांनी कायम लक्षात ठेवली आणि अधिकारी होण्याची स्वप्ने पाहण्यास सुरवात केली. केवळ स्वप्ने न पाहता त्यासाठी कष्ट, सचोटी आणि जिद्दीने प्रयत्न सुरु केले. समाजात सन्मान हवा असेल तर तो फक्त शिक्षणानेच मिळू शकतो याची खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी शिकण्याचा ध्यास घेतला.

त्यांचा विवाह 1997 मध्ये झाला आणि 2002 मध्ये पतीने त्यांना सोडून दिले. आपले लग्न मोडले आहे या धक्क्यातून सावरण्यास त्यांना खूप वेळ लागला. यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणून त्यांनी बाहेरून शाळा शिकण्यास सुरुवात केली आणि 2016 मध्ये त्या पदवीधर झाल्या.

असे असले तरी झाडलोट करण्याचे काम आणि त्यावरून ऐकावे लागणारे टोमणे त्यांना अस्वस्थ करत होते. त्यामुळे नोकरी करत असतानाच त्यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेची (आरएएस) तयारी सुरु केली. 2018 मध्ये त्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्या.

त्यासाठी त्यांनी इतकी मेहनत घेतली होती आणि अभ्यास केला होता की, दिवस आणि रात्र यातील फरकच मला कळत नव्हता, असे त्या सांगतात. ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी अंतिम परीक्षा दिली आणि इतके दिवस त्या निकालाची वाट पहात जोधपूरमधील रस्त्यांवर झाडलोटीचे काम करत होत्या.

मंगळवारी निकाल जाहीर झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या म्हणतात, हा सगळा प्रवास अतिशय कठीण असला तरी यापुढे मी जे भोगले आहे, जो अन्याय सहन केला तशी वेळ इतरांवर येऊ नये याची काळजी घेणार आहे.

ही अतुलनीय कामगिरी केल्यामुळे जोधपूर उत्तर आणि जोधपूर दक्षिण अशा दोन्ही महापालिकांच्या महापौरांच्या मधे त्यांना बसवण्यात आले होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्या महापालिकेत आपण इतकी वर्षे झाडलोटीचे काम केले.

त्याच महापालिकेत अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आता यापूर्वीचा संघर्ष आणि प्रतिकूल दिवसातील कटू आठवणी मागे सोडून नव्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करायची असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.