रविवारी दिवसभरात 4 हजार 426 नवे बाधित आढळले; सोमवारी बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक
दोन दिवसांत 32 हजारांवर चाचण्या
पुणे – शहरात निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरही करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन दिवसांत पुणे शहरात तब्बल 7 हजार नवे बाधित आढळले आहेत. त्यात रविवारी विक्रमी 4 हजार 426 नवीन बाधितांची नोंद झाली आहे, तर सोमवारी काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोमवारी नवीन बाधितांचा आकडा 2,547 पर्यंत खाली आला असून 2 हजार 771 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर या दोन दिवसांत सुमारे 67 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 16 जण पुण्याबाहेरील असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. तर दोन दिवसांत तब्बल 32 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 4 हजार 4426 बाधित रुग्ण आढळून आले. रविवारच्या आकडे आतापर्यंतचे सर्वाधिक असल्याने सर्वच यंत्रणा तसेच सर्वसामान्यांनाही धडकी भरली असतानाच सोमवारी मात्र, दिलासा देणारे चित्र समोर आले. सोमवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख़्या अधिक असून सोमवारी 2547 नवे बाधित आढळले तर 2,771 जणांना डिस्चार्ज मिळाला.