नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया’ कंपनीत भ्रष्ट व्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांची आज सीबीआय कोठडी संपल्याने चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पुन्हा चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
दरम्यान चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले होते. त्यानुसार आज सीबीआय कोठडी संपल्याने चिदंबरम यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार देत चिदंबरम यांना दणका दिला असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पाच वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दरम्यान आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अटक झाल्यानंतर सुनावणीला काहीच अर्थ राहत नाही. तर गैरव्यवहार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असून त्यासंदर्भात ईडीने आरोपपत्र देखील दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये चिदंबरमयांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांनी या माध्यमातून पैशांचा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.