मुळशीतील विकासकामांना झुकते माप

आमदार संग्राम थोपटे : पौड येथे मतदारांशी साधला संवाद
पिरंगुट –
भोर विधानसभा मतदारसंघ हा तीन तालुक्‍यांचा आणि भौगोलिक रचनेत अत्यंत आवघड असा मतदार संघ आहे. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात 553 कोटींची विकासकामे केली असून भोर-वेल्हे तालुक्‍यांच्या तुलनेत मुळशी तालुक्‍याला झुकते माप दिले आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

पौड (ता. मुळशी) येथील कॉंग्रेस भवनात भोर विधानसभामतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार आमदार थोपटे यांच्या प्रचाराचे नियोजन व बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते मतदारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोकराव मोहोळ, माजी खासदार विदुराजी नवले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा. सविता दगडे, रामभाऊ ठोंबरे, मुळशी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव कोंढरे, आदी मान्यवरांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार थोपटे म्हणाले की, मुळशी तालुक्‍यात पंतप्रधान घरकुल योजनेत 241 प्रकरणांना मंजुरी मिळवली असून 6 कोटी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 40 कोटी 45 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून भोर आणि वेल्हे या दोन तालुक्‍यांच्या तुलनेत हा निधी सर्वांत जास्त आहे. भरे येथे सुरू असलेल्या क्रीडा संकुलासाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी नमूद केले.

सभेत माजी खासदार विदुराजी नवले, रामभाऊ ठोंबरे, प्रा. सविता दगडे, महादेव कोंढरे, यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदार थोपटे यांच्या विजयाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळशी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, सूत्रसंचालन मधूर दाभाडे, तर सुनील चांदेरे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.