जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे संकेत
विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला फक्त चाळीस जागा मिळतील, तर भाजप व मित्र पक्षांना 248 जागा मिळणार असल्याचे भाकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच एकनाथ खडसे यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जत येथे पालकमंत्री राम शिंदे यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. मोनिका राजळे देखील उपस्थित होत्या. महाजन म्हणाले, “भाजप नेते एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज नसून त्यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे.
चाळीसच्यावर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही. भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डात उमेदवारीबाबत निर्णय होत असतात. काही कारणामुळे बोर्डाने खडसे यांना उमेदवारी दिली नसेल. खडसे यांच्यावर आणखी काही वेगळी जबाबदारी देण्यात येऊ शकते. पक्षाने त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांचे आता समाधान झाले आहे. इतरत्र बंडखोरीचे चित्र दोन दिवसांत कमी होईल. पुन्हा पक्षातील सर्वजण एकत्रितपणे काम करतील,’ असे ते म्हणाले. “मावळला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची पिढी निवडणुकीत उतरली होती. त्यांना तेथे जनतेने उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या नाराजीनाट्याच्या भूमिकेबद्दल काहीतरी वेगळे कारण आहे. लोकसभेला शरद पवारांना माघार घ्यावी लागली. याचे कारण तिसरी पिढी मागे हटायला तयार नाही,’ असेही महाजन यांनी सांगितले.