भारत ‘अ’ संघास 71 धावांची आघाडी

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) – रिद्धीमान साह व शिवम दुबे यांनी शानदार अर्धशतके केली, त्यामुळेच भारत ‘अ’ संघास वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरूद्धच्या पहिल्या अनधिकृत क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेता आली. वेस्ट इंडिजने केलेल्या 228 धावांना उत्तर देताना भारताने 99 षटकांत 8 बाद 299 धावा केल्या.

भारताने 1 बाद 70 धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. प्रियांक पांचाळ व शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. पांचाळने 5 चौकारांसह 49 धावा केल्या. गिल याने 40 धावा करताना 3 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. कर्णधार हनुमा विहारीने 31 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ श्रीकर भरत शून्यावर बाद झाल्यामुळे भारताचा डाव अडचणीत सापडला.

भारताची ही घसरगुंडी थोपविण्याची जबाबदारी साह व दुबे यांच्यावर आली. त्यांनी शैलीदार खेळ करीत संघाचा डाव सावरला. साहने सहा चौकारांसह नाबाद 61 धावा केल्या. साह याची भारताच्या वरिष्ठ संघात यष्टीर्क्षक व फलंदाज म्हणून निवड झाली असल्यामुळेच त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. त्याने वरिष्ठ संघातील निवड येथे सार्थ ठरविली आहे. दुबेने आक्रमक खेळ करीत 71 धावा टोलविल्या. त्याने 7 चौकार व 4 षटकार अशी फटकेबाजी केली. तो बाद झाल्यानंतर भारताने कृष्णप्पा गौतम (6) व शहबाज नदीम (0) यांच्याही विकेट्‌स गमाविल्या. नदीम खेळाच्या अंतिम षटकात बाद झाल्यामुळे खेळ थांबविण्यात आला.

वेस्ट इंडिजकडून वेगवान गोलंदाज मिग्वेल कमिन्सने तीन गडी तर ऑफस्पीनर राहकीम कॉर्नवॉलने दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज “अ’ पहिला डाव 66.5 षटकांत सर्वबाद 228
भारत “अ’ पहिला डाव 99 षटकांत 8 बाद 299 (रिद्धीमान साह नाबाद 61, शिवम दुबे 71, प्रियांक पांचाळ 49, शुभमन गिल 40, मिग्वेल कमिन्स 3-36, राहकीम कॉर्नवॉल 2-51)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)