नवी दिल्ली- आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बहीण-भावाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच या पवित्र नात्यासाठी ‘रक्षाबंधन’ हा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. परंतु याच पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडली आहे.
एका तरुणाने आपल्या 19 वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार करून त्याचे अश्लील व्हिडीओ तयार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नेमके काय प्रकरण? वाचा…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पीडित तरुणीवर तिचा चुलत भाऊ खाणेरडी नजर टाकत असे. 12 डिसेंबर 2021 च्या रात्री ती घराच्या गच्चीवर असलेल्या खोलीत झोपली होती. या दरम्यान तिचा भाऊ तेथे आला आणि त्याने तरुणीचे तोंड बंद करून बलात्कार केला व त्याचा अश्लील व्हिडीओ तयार केला.
यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला आणि घरच्यांना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणी खूप अस्वस्थ होती.
अशा स्थितीत तिच्या आईने तिला अस्वस्थतेचे कारण विचारले असता तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर तिच्या नातेवाईकांनी लगेच पोलीस ठाणे गाठून तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. तसेच त्याचावर पोक्सो व आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.