दमदारपणे वाटचाल करणारी दिविज लॅब

दिविज लॅबोरेटरीज ही भारतातील ऍक्‍टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस्‌ (एपीआय) आणि इंटरमिजिएट्‌सचे उत्पादन करणारी कंपनी आहे. भारतातील मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असून कंपनीची 120 पेक्षा जास्त उत्पादने आहेत. कंपनीचे चार उत्पादन प्रकल्प असून अनेक देशांमधील बाजारपेठांमध्ये कंपनीने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. कंपनीचा पहिला उत्पादन प्रकल्प हैदराबादजवळील भुवनगिरी जिल्ह्यातील लिंगोजीगुडेम येथे उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी बहुविध उत्पादन सुविधा असणारे 11 ब्लॉक्‍स आणि एपीआयच्या अंतिम उत्पादनाचा ब्लॉक आहे. कंपनीचा दुसरा उत्पादन प्रकल्प विशाखापट्टणमपासून 30 किलोमीटर अंतरावरील चिप्पाडा येथे आहे. हा प्रामख्याने निर्यात उत्पादनासाठीचा प्रकल्प आहे.

मेसर्स दिविज लॅबोरेटरीज (यूएसए) इन्कॉर्पोरेशन आणि स्वित्झर्लंडमधील मेसर्स दिविज लॅबोरेटरीज युरोप एजी या कंपनीच्या उपकंपन्या आहेत. दिविज लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीची स्थापना 1990 मध्ये दिविज रिसर्च सेंटर (डीआरसी) म्हणून झाले. संशोधन आणि विकास हे त्यावेळी त्यांचे प्रमुख काम होते. 1991 ते 93 या कालावधीत कंपनीने औषध उत्पादन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांसाठी इंटरमिजिएट्‌स आणि बल्क ऍक्‍टिव्ह तयार करण्याच्या अनेक व्यावसायिक प्रक्रिया यशस्वीपणे विकसित केल्या. कंपनीच्या कामाचे वाढते क्षेत्र नावातून समजावे यासाठी 1994 मध्ये कंपनीचे नाव दिविज लॅबोरेटरी लिमिटेड असे करण्यात आले. 1995 पासून कंपनीने हैदराबादजवळील पहिल्या प्रकल्पात उत्पादन करण्यास सुरवात केली. 2002 मध्ये कंपनीने विशाखापट्टणमजवळील चिप्पाडा येथील दुसऱ्या उत्पादन प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ केला. निवडक व्यवसायातील नेमक्‍या आणि नवख्या क्षेत्रातील पायाभूत संशोधनासाठी कंपनीने 2003 मध्ये डीआरसी- विझॅग हे नवीन संशोधन केंद्र सुरू केले. त्याचवर्षी कंपनीने शेअर बाजारात पदार्पण केले.

2006-07 कंपनीने विशाखापट्टणम येथील चिप्पाडाजवळ 250 एकर क्षेत्रावर दिविज फार्मा स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) विकसित केला. त्याठिकाणी नवीन उत्पादन सुविधा तसेच आधीच्या उत्पादन प्रकल्पातील क्षमता वाढवणारी सुविधा निर्माण करण्यात आली. नंतर कंपनीची उत्पादन क्षमता वाढतच गेली, आज कंपनीच्या तीन उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि तीन संशोधन व विकास केंद्रांमध्ये 14000 उच्च दर्जाचे प्रशिक्षित कर्मचारी सुमारे 350 संशोधक कार्यरत आहेत.

अमेरिकेतील एपीआय बाजारपेठेतील भारतीय निर्यातदारांचा हिस्सा वाढत आहे. स्वाभाविकपणे युरोप आणि चीनमधील या क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांचा हिस्सा कमी होत आहे. मार्च 2020 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात दिविजचा 90 टक्के महसूल निर्यातीतून प्राप्त झालेला आहे. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ती करारानुसार संशोधन आणि उत्पादन सेवा (सीआरएएमएस) आणि ऍक्‍टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस्‌ (एपीआय) अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. सध्या कंपनीचे उत्पादन हैदराबाद आणि विशाखापट्टणमजवळील अशा दोन प्रकल्पांवर चालू आहे.

या दोन्ही ठिकाणी उत्पादनासाठी एकूण 35 इमारती आहेत. त्यातून कंपनी जगातील आघाडीच्या एपीआय उत्पादकांपैकी एक बनली आहे. कंपनीचा तिसरा उत्पादन प्रकल्प काकिनाडा येथे आकारास येत आहे. कंपनीची भविष्यातील विस्तार योजना आणि चीनमधील पुरवठादारांवरील अवलंबित्व भारत सरकार कमी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक व्यवसाय संधी हस्तगत करण्याची कंपनीची क्षमता यामुळे भविष्यात या कंपनीचा शेअर चांगला परतावा देऊ शकतो. आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे कंपनी नवीन उत्पादन सुविधा उभी रहात आहे. भांडवलाचा शिस्तबद्ध पद्धतीने वापर हे या कंपनीचे वैशिष्ट्‌य सांगितले जाते.

(शुक्रवारचा बंद भाव – 3369.85 रुपये)
– सुहास यादव
suhaspyadavgmail.com

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.