पुणे – गॅसचा रेग्युलेटर व्यवस्थीत बसत नसल्याने एका ज्येष्ठ महिलेने गुगलवरुन गॅस कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला. मात्र नंबरवर संपर्क साधताच महिलेच्या बॅंक खात्यातून काही सेकंदातच पाच लाख 73 हजार रुपयांची रक्कम सायबर भामट्याने लांबवली.
याप्रकरणी भांडारकर रस्त्यावर रहाणाऱ्या एका 64 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला पतीसह एका अपार्टमेंटमध्ये रहाते. तीच्या घरातील गॅस सिलेंडर संपला असल्याने तीने दुसरा गॅस सिलेंडर लावायला घेतला होता. मात्र रेग्युलेटर बसत नसल्याने तीने दुधवाल्याला तो लावायची विनंती केली. त्यालाही रेग्युलेटर बसत नसल्याने त्याने कस्टमर केअर किंवा एच.पी. गॅस कंपनीच्या व्यक्तीला बोलवण्यास सांगितले.त्यानंतर महिलेने गुगलवरुन गॅस कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवला.
फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीने ऑन लाईन 25 रुपये जमा केल्यास आमचा माणून येऊन रेग्युलेटर बसवेल, त्यासाठी अगोदर क्वीक हेल्प नावाचे ऍप डाऊन लोड करा असे सांगितले. त्यांनी ऍपवर सांगितल्या प्रमाणे बॅंकखात्यासह सर्व माहिती भरली. यानंतर आलेली ओटीपी समोरच्या व्यक्तीने मोबाईल हॅक करुन घेतला.
यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 99 हजार आणि 25 हजार रुपयांची ट्रांन्सजॅक्शन झाली. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बॅंकेत फोन करुन बॅंक खाते फ्रीज करायला सांगितले. तोवर त्यांच्या खोत्यातून आणखी 49 हजार, दोन लाख आणि एक लाख रुपये सायबर भामट्याने काढूनही घेतले होते. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शफील पठाण करत आहे.