सोलापूर – येत्या आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये 17 जुलै दुपारी 2 वाजल्यापासून ते 25 जुलै दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर 18 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.
आषाढी वारीसाठी वाखरी येथे मनाच्या दहा पालख्या 19 तारखेला येणार आहेत. तिथून प्रतिकात्मक पायी वारीसाठी इसबावीपर्यंत 40-40 च्या दहा गटांमध्ये हे वारकरी येणार आहेत.
तिथून पुढे प्रत्येक पालखीचे दोन प्रतिनिधी असे एकूण 20 लोक पुढचे साडेचार किलोमीटर पायी चालत येणार आहेत. तर उर्वरित 380 लोक आपापल्या वाहनांमध्ये आपापल्या मठांकडे प्रस्थान करणार आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका आणि पंढरपूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 3 हजार पोलिसांचा फौजफाटा यासाठी सज्ज असणार आहे. दरम्यान, वारीला परवानगी असणारे वारकरी आणि पोलीस यांची करोना चाचणी करूनच पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते 20 जुलै रोजी पहाटे 2:20 ते 3:30 पर्यंत शासकीय महापूजा होणार आहे. त्यानंतर सर्व मानाच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी 19 जुलै रोजी आगमन होऊन दिनांक 24 जुलै रोजी पंढरपूरहुन प्रयाण करतील.
पंढरपूर एसटी महामंडळाच्या आगारातून सुरू असणारी सर्व प्रकारची वाहतूक सेवा तसेच अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व खाजगी वाहतूक सेवा 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
मानाच्या दहा पालख्या येणार
प्रतिवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला येणाऱ्या विविध संस्थानांच्या पालखी सोहळ्यांमध्ये संस्थानांच्या पालख्यांची श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पादुका भेटीची परंपरा आहे. ही बाब विचारात घेता पादूका भेटीची परंपरा असलेल्या एकूण दहा संस्थानांच्या पालख्या पंढरपूरला आणण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
त्यामध्ये श्री. संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण, श्री. संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, चांगावटेश्वर देवस्थान, सासवड, श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, श्री. संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, श्ी विठ्ठल रुक्माई संस्थान, कौंडण्यपूर, श्ी. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, पंढरपूर, श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, श्री. संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर.