पिंपरी, दि. 21 – एका प्रतिष्ठित बॅंकेच्या अस्तित्वात नसलेल्या म्युच्युअल फंड कंपनीच्या नावाने वृद्ध व्यक्तीस ईमेल आला. त्यानंतर एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने गुंतवणुकीबाबत चांगला प्लॅन सांगितल्याने वृद्ध व्यक्तीने तब्बल 23 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर खात्री केली असता हा सगळा फ्रॉड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुभाष माळी (वय 69, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डी सी शर्मा, कपूर, मल्होत्रा आणि अन्य अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे.
माळी हे एका फार्मा कंपनीतून मोठ्या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांना पीएनबी मेटलाइफ म्युच्युअल फंड या कंपनीचे नाव असलेला एक ईमेल आला. त्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याबाबत आकर्षक ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर माळी यांना एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने देखील गुंतवणुकीची चांगली ऑफर सांगितली. पीएनबी मेटलाईफ ही नावाजलेली कंपनी असल्याने या कंपनीत गुंतवणूक करण्यास माळी तयार झाले. 10 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर या 98 दिवसांमध्ये 59 ऑनलाईन व्यवहारांद्वारे माळी यांनी एका बॅंक खात्यावर 23 लाख 25 हजार 100 रुपये पाठवले.
जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून माळी यांना वारंवार पैसे भरण्यास आरोपी सांगू लागले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी पीएनबी मेटलाईफच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात जाऊन चौकशी केली. मात्र पीएनबी मेटलाईफ केवळ विमा क्षेत्रात काम करत असून म्युच्युअल फंडबाबत कोणतेही व्यवहार बघत नसल्याचे समजले. माळी यांनी आरोपींना यापुढे गुंतवणूक करायची नसून भरलेले पैसे परत मागितले. त्यानंतर देखील आरोपींनी दोन लाख 70 हजार रुपयांची मागणी केली. माळी यांनी दिलेली रक्कम आरोपींनी परत न करता त्यांची फसवणूक केली.