रांची – झारखंड मधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकारही पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सत्तारूढ आघाडीच्या सर्व आमदारांना खुंटी येथील रिसॉर्ट मध्ये हलवण्यात आले आहे. या आमदारांना छत्तीसगड किंवा राजस्थानात हलवण्यात येईल असे सुरूवातीला सांगितले जात होते परंतु त्यांना राज्यातच खुंटी येथील रिसॉर्ट मध्ये हलवण्यात आले आहे.
आज सकाळी सोरेन यांनी सत्तारूढ आमदारांची एक बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली होती. त्यानंतर या आमदारांना तीन बसेस मधून अन्यत्र हलवले गेले. हे आमदारही आपल्या बॅंगा घेऊनच बैठकीसाठी आले होते. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी आम्ही पिकनिकला चाललो आहोत असे मोघम उत्तर दिले.
मुख्यमंत्री सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपालांना केल्यानंतर राज्यातील युपीएचे सरकार अस्थिर झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर सत्तारूढ आघाडीने वेगाने हालचाली सुरू केल्या. दरम्यान मुख्यमंत्र्यांना अपात्र ठरवण्यात आले असले तरी त्यांच्यापुढे अन्यही पर्याय असल्याने त्यांच्या खुर्चीला तातडीने कोणताही धोका नाही असे सांगण्यात येत आहे. त्यांना सहा महिन्याच्या आत पुन्हा निवडून यावे लागणार आहे.
तो पर्यंत ते मुख्यमंत्रीपदी राहु शकणार आहेत. तीन कॉंग्रेस आमदारांमार्फत झारखंडच्या अन्य आमदारांना पैसे देऊन फोडण्यात येत असल्याची बाब उघड झाल्यानंतर राज्यातील हालचालींनी वेग घेतला. या तीन आमदारांना पश्चिम बंगाल पोलिसांनी पैशाच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले होते. (An attempt to topple the government in Jharkhand; The MLAs were shifted to a safe place)