कोरडगाव येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पाथर्डी: कोरडगाव येथील इंडिया वन कंपनीचे एटीएम मशीन चोरांनी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. कोरडगाव चौकात असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी तोडून सुमारे एक किलोमीटर अंतरावर वाहनाच्या मदतीने ओढत नेले. मात्र कॅश ठेवण्याची तिजोरी फोडण्यात चोरांना अपयश आल्याने अर्धवट फोडलेले मशीन सोडून चोरटे पसार झाले.

सकाळी घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर शाहीचा स्प्रे मारून चोरांनी मशीन तोडल्याची पोलिसांनी माहिती दिली. सुमारे पाच वर्षापासून कोरडगाव येथे इंडिया वन कंपनीचे एटीएम मशीन सुरू होते. मात्र येथील सुरक्षा गार्ड नसल्याने ही घटना घडली. शुक्रवारी मशीनमध्ये कॅश लोड करण्यात आली होती. कॅश लोड केल्यानंतरच एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने चोरांची पाळत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तपास कार्यात मदत होण्यासाठी पोलिसांनी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञाच्या पथकाला पाचारण केले होते.

श्‍वानाने काही अंतरावर चोरांचा माग काढला. त्यानंतर चोर वाहनातून पसार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एटीएम मशीन तोडल्यामुळे मशीनचा मुख्य सरव्हरशी संपर्क तुटला असल्याने मशीनमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्याचबरोबर चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला असल्याची माहितीही झोनल मॅनेजर जयदीप अजमाने यांनी दिली. एटीएम मशीनमध्ये नेमकी किती रक्कम शिल्लक होती, याबाबत उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नसल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)