सातारा (प्रतिनिधी) – जादूटोणा विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू होण्यासाठी केंद्र शासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना मंगळवारी दिले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त समितीच्या पदाधिकार्यांनी जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी उदयनराजेंची भेट घेतली. या निवेदनात म्हटले आहे की, समाजात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बुवाबाजी, शोषण यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
उत्तर प्रदेशातील हाथरससारख्या घटनांमुळे शेकडो गरीब लोकांचे प्राण जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे संपूर्ण देशात जादूटोणा विरोधी कायदा लागू होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत.
या निवेदनावर कार्यवाही करण्याची सूचना संबंधितांना उदयनराजे यांनी दिली. याबाबतच्या विधेयकासाठी केंद्र सरकारच्या सुकाणू समितीकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.