लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीज सईद याला दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानमधील दहशतवाद प्रतिबंधात्मक न्यायालयाने 11 वर्ष कारावासाची शिक्षा ठोटावली. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील दोन दहशतवादी घटनांत त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली असल्याचे या न्यायालयाने मान्य केले असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
हाफीज आणि त्याचा निकटच्या साथिदाराला 11 डिसेंबरपासून सुनावणीसाठी रोज न्यायलयात येण्याचे आदेश या न्यायालयाने बजावले होते. प्रत्येक गुन्ह्यासाठी सईदला साडेपाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याने कारावासाच्या दोन्ही शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत. लाहोर आणि गुजरानवाला येथे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सईद याच्या नेतृत्वाखाली जमात उद दवा ही संघटना लष्कर ए तोयबाचे मुळ असल्याचे मानले जाते. या संघटनेने 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 116 जण मरण पावले होते. अमेरिकेने सईदला त्यानंतर जागतिक दहशतवादी जाहीर केल होते. सईदचा शिक्षा करण्यासाठी योग्य माहिती देणाऱ्यास 2012पासून अमेरिकेने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.