पिंपरी – कागदपत्रे गहाळ झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षणात अद्याप 3915 कोटी 82 लाख रुपयांची रक्कम आक्षेपाधीन आहे. तर, 387 कोटी 22 लाख रुपयांच्या खर्चांबाबत अद्याप विविध बाबींची पूर्तता न केल्याने ही रक्कमही आक्षेपाधीन आहे.
शहरात करोनाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेने मोठ्या संख्येने कर्मचारी त्यासाठी गुंतविले आहेत. तसेच, सध्या 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच महापालिकेचे काम सुरू असल्याने देखील 2019-20 या आर्थिक वर्षाचे “ऑडिट’ अद्याप सुरू होऊ शकलेले नाही.
महापालिकेच्या तब्बल 34 वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालाचा लेखाजोखा तपासला असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे. 1982-83 ते 2016-17 या कालावधीत कोट्यवधी रुपयांची कागदपत्रे गहाळ झाल्याने ती लेखापरीक्षण विभागाला तपासणीसाठी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे तब्बल 4 हजार 423 कोटी 55 लाख रुपयांची रक्कम आक्षेपाधीन ठेवण्यात आली होती. त्यातील 507 कोटी 73 लाख रुपये रकमेची कागदपत्रे विविध विभागांकडून तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. 3915 कोटी 82 लाख रुपये रकमेची कागदपत्रे तपासणीसाठी अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे संबंधित रक्कम लेखापरीक्षण विभागाने अद्याप आक्षेपाधीन ठेवली आहे.
लेखापरीक्षणात 107 कोटींची वसूलपात्र रक्कम
विविध विभागांच्या केलेल्या लेखापरीक्षणात आक्षेप असल्याने एकूण 157 कोटी 97 लाख रुपयांची रक्कम वसूलपात्र होती. त्यातील 50 कोटी 4 लाख रुपयांची रक्कम वसूल झाली. अद्याप 107 कोटी 93 लाख रुपयांची रक्कम वसूलपात्र आहे.
42 हजार आक्षेप
लेखापरीक्षणामध्ये ठराविक खर्च केलेल्या रकमेबाबत महापालिकेच्या विविध विभागांनी दिलेले विश्लेषण मुख्य लेखापरीक्षकांना पटले नाही. काही कामांबाबत पुरेशी कागदपत्रे विभागांकडून उपलब्ध करून देण्यात आली नाही, त्यामुळे एकूण 1 लाख 27 हजार 811 आक्षेप काढण्यात आले होते. त्यातील 85 हजार 530 आक्षेपांची पूर्तता झाली. तर, अद्याप 42 हजार 281 आक्षेप प्रलंबित आहेत. प्रलंबित आक्षेपांसाठी सद्य:स्थितीत एकूण 387 कोटी 22 लाख इतकी रक्कम अद्याप आक्षेपाधीन आहे.
महापालिकेचे 2010 ते 2015 अशा पाच वर्षांचे “ऑडिट’ सध्या संपत आले आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने 2019-20 या आर्थिक वर्षाचे तूर्त लेखापरीक्षण करू नये, असे परवाना आणि विद्युत विभागाने कळविले आहे. महापालिकेतील बहुतांश कर्मचारी करोनाविषयक कामात गुंतले आहेत. 15 टक्के कर्मचारी संख्येत काम सुरू आहे. अशा विविध कारणांमुळे गतवर्षीचे “ऑडिट’ सुरू होऊ शकलेले नाही. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर हे “ऑडिट’ सुरू केले जाईल.
– आमोद कुंभोजकर, मुख्य लेखा परीक्षक.