अवैध दारुसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

कारचा पाठलाग करुन दोघांना अटक

पुसेसावळी – खटाव तालुक्‍यातील गोरेगाव वांगी येथील माने वस्तीनजीक विनापरवाना दारुची वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी सुमारे 3 लाख 51 हजार 654 रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेतला. यातील सुनील भगवान जाधव (वय 30, रा. निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली) व राहुल दादा शिंदे (वय 29, रा. हिंगणगाव बुद्रुक, ता. कडेगाव, जि. सांगली) या दोघांना अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हुंडाई कंपनीची चार चाकी (क्रमांक एम.एच.02-ए.क्‍यू.4616) ही गाडी घाट माथ्याकडून पुसेसावळीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती.संबंधित गाडी पुसेसावळी येथील दत्त चौकात अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने गोरेगाव वांगी या दिशेला नेली. यावेळी पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून गोरेगाव वांगी येथील माने वस्तीनजिक पकडली.

त्यांच्या ताब्यातील सुमारे 21 हजार 654 रुपयांच्या दारूचे बॉक्‍स व सुमारे तीन लाख 30 हजार किंमतीची हुंडाई कंपनीची गाडी ताब्यात घेतली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या घटनेची फिर्याद प्रशांत प्रकाश पाटील यांनी पोलिसात दिली आहे.

कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सुधीर येवले, पोलीस वळकुंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास हवलदार सुभाष भोसले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.