मातंग समाजाच्या मागण्यांसाठी विधानभवनाच्या प्रवेशव्दारात आंदोलन

मागण्यांविषयी तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन - आमदार सुनिल कांबळे

पुणे : महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे व उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेव ससाणे बुधवारी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ मागण्यांचे फलक परिधान करून सरकारचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात आणि मातंग समाजाची वर्गवारी करुन अ, ब, क, ड नुसार स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. याबरोबरच समाजातील विविध मागण्यांसाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मातंग समाज वास्तव्यास असून समाजातील बहुतांशी नागरिक भूमीहीन आहेत. ते मोलमजुरी करून आपले जीवन जगत आहेत. उच्च शिक्षणापासून तर हा समाज वंचितच आहे. तसेच शासकीय सेवेत देखील या समाजातील युवकांची संख्या अतिशय कमी आहे. शासनाने मातंग समाजाच्या मागण्या व प्रश्‍न सोडवून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याची आवश्‍यकता असल्याचे या दोन्ही नेत्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच शासनाने या मागण्यांविषयी तातडीने दखल न घेतल्यास मातंग समाजाच्या माध्यमातून भविष्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आमादार कांबळे यांनी यावेळी दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.