महापालिकेवर प्रशासक नियुक्त व्हायला हवा
नगर -करोना विषाणू रोखण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनात महापालिकेची यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे नगरमधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयएएस दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नगर महापालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती भैरवनाथ वाकळे यांनी दिली.
महापालिका आयुक्त सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांना कामाचा उरक नाही. त्यांच्याकडून नैसर्गिकपणे ठोस निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. त्यात त्यांच्यावर मोठा राजकिय दबाव असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नागरिकांना महापालिकेकडून अपेक्षित असलेल्या आरोग्यविषयक सेवा खासगीकरण करण्याचे घाट घातले जात आहेत. स्वॅब सेंटरचे खासगीकरण केलेले आहे.
त्यात महापालिकेचे काही अधिकारी-कर्मचारीच करोनाग्रस्त असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांचीच तपासणी वेळेवर होत नसल्याने कामगार संघटनेने आंदोलन केले होते. महापालिकेचे बरेच कामकाज बंद आहे. त्यातही महापालिका प्रशासन, पदाधिकारी व शहरातील नागरिकांत संवादाचा व समन्वयाचा अभाव दिसतो. बैठकीतील काही गंभीर स्वरुपाची माहिती बैठकीतील खासगी व्यक्तींकडून सोशल मीडीयाद्वारे बाहेर पडल्याने शहरातील नागरिकांध्ये 16 जुलैला लॉकडाऊनबाबत अफवायुक्त गंभीर पेच निर्माण झालेला होता.
या सर्वच घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची गरज असल्याची भूमिका भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे राज्य सहसचिव ऍड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव ऍड. शांताराम वाळुंज, जिल्हा सहसचिव ऍड. सुधीर टोकेकर, जिल्हा सहसचिव भारती न्यालपेल्ली, जिल्हा सहसचिव संतोष खोडदे, शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांनी केली आहे.





