नाशिक, – नंदुरबार जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2021-2022 या वर्षासाठी 130 कोटी रुपयांच्या आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आज मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिंक योजनेअंतर्गत सन 2021-2022 च्या आराखड्यासाठी 69 कोटी 57 लक्ष रुपयांची मर्यादा शासनाकडून देण्यात आली होती.
जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय बैठकीत त्यानुसार खर्चाच्या मर्यादेत आराखडा सादर करण्यात आला होता. विविध विभागांची अधिकची मागणी लक्षात घेऊन 60 कोटी 43 लाख रुपयांचा वाढीव म्हणजेच 130 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी राज्यस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. अमरावती मध्यम प्रकल्प ते अमरावतीनाला लघु पाटबंधारे योजना नदीजोड कालव्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ असे पवार यांनी सांगितले.