कौलीमळ्यातील एक एकर ऊस खाक

वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागली आग : शेतकऱ्याचे मोठे नुकसान

अवसरी – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील कौलीमळा येथील शेतकऱ्याच्या शेतातील एक एकर ऊस वीज तारांचे घर्षण होवुन जळाला आहे. तातडीने शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्याने शेजारील सुमारे साडेचार एकर ऊस वाचविण्यात यश आले.

अवसरी फाट्याच्या पूर्वेस कौलीमळा येथील सर्व्हे नंबर 43 मध्ये डिंभे उजव्या कालव्याच्या जवळ संतोष भोर यांच्या दोन एकर क्षेत्रात एक वर्षांपूर्वी ऊस लागवड केली होती. उसाच्या शेजारुन उच्च दाबाच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत.
दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास तीन फेजपैकी सर्वांत वरील बाजूची वीजवाहक तार तुटून दुसऱ्या तारेवर पडल्याने स्पार्किंग होऊन उसाला आग लागली. शेतकरी संतोष भोर यांना ही माहिती समजताच संदीप भोर, गणेश भोर, जितेंद्र यादव, अजिंक्‍य भोर, निखील भोर आणि घरातील सदस्यांनी गोवर्धन दूध कंपनीच्या पाण्याचा वापर करुन तसेच पेटत्या उसावर पाणी मारुन आग विझवली.

महावितरण कंपनीचे वायरमन श्रीधर तांबडे यांना या संदर्भात माहिती कळविली असता त्यांनी विद्युतपुरवठा बंद केला, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. शेतकरी संतोष भोर यांच्या दोन एकर उसाच्या क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रातील ऊस वाचवण्यात यश आले आहे.

भोरवाडीचे पोलीस पाटील अमित भोर यांचा दोन एकर तर अर्जुन टाव्हरे यांचा सुमारे दीड ते दोन एकर ऊस तोडणी योग्य होता; परंतु वातावरणात जोरदार हवा नसल्याने आणि नुकताच पाऊस होऊन गेल्याने ओलसर उसाच्या पाचटाला आगीची दाहकता कमी होती. अनेकवेळा वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारेतील घोळाबाबत कल्पना दिली होती; परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने शॉर्ट सर्किट झाले असल्याचे शेतकरी संतोष भोर यांनी सांगितले. महसूल प्रशासनाने जळालेल्या उसाचा पंचनामा करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.