#IPL2020 : कमिन्सने कोलकाताला सावरले

आबूधाबी  – सुरुवातीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतरही पॅट कमिन्स व कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या अफलातून फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला 5 बाद 148 धावा अशी समाधानकारक स्थिती प्राप्त करता आली. 

लेगस्पीनर राहुल चहर, जसप्रीत बुमराह, नाथन कुल्टरनाइल व ट्रेन्ट बोल्ट यांच्या भेदक गोलंदाजीसमोर कोलकाताचा डाव सुरुवातीला 5 बाद 61 असा गडगडला. मात्र, त्यानंतर कमिन्स व मॉर्गनने जबाबदारीने खेळ करत डाव सावरला. या जोडीने 6 व्या गड्यासाठी 87 धावांची बहुमोल भागीदारी केली. या जोडीने अखेरच्या पाच षटकांत 53 धावा काढल्या. कमिन्सने अर्धशतकी खेळी केली. त्यात त्याने 36 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 2 षटकार फटकावत नाबाद 53 धावा केल्या. मॉर्गननेही 29 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावा केल्या.

मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी निराशाजनक ठरला. नियमित कर्णधार दीनेश कार्तिकने नेतृत्व सोडल्याने मॉर्गनकडे ही जबाबदारी आली. संघाचे अर्धशतक फलकावर लागण्यापूर्वीच त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले होते. सलामीवीर शुभमन गील चांगली फलंदाजी करत होता. मात्र, त्यालाही आक्रमक फलंदाजी करण्याचा मोह आवरता आला नाही.

ट्रेन्ट बोल्टने राहुल त्रिपाठीला बाद केल्यानंतर स्थिरावू पाहणाऱ्या गीलला लेगस्पीनर चहरने बाद केले. त्यानेच माजी कर्णधार कार्तिकला बाद करत सामन्यातील अपला दुसरा बळी घेतला. त्यापूर्वी कुल्टरनाइलने नितीश राणालाही तंबूत धाडले. फर्स्ट चेंज गोलंदाजी करताना बुमराहने सर्वात धोकादायक आंद्रे रसेलला बाद करत कोलकाताच्या फलंदाजीला ग्रहण लावले.

कोलकाताने सांघिक धावसंख्येची साठी ओलांडली तेव्हा त्यांचा निम्मा संघ बाद झालेला होता. या सामन्यासाठी कोलकाताने संघात दोन बदल केले. टॉम बॅन्टनच्या जागी ख्रिस ग्रीनचा तर कमलेश नागरकोटीच्या जागी शिवम मावी याला संधी दिली. मुंबईने केवळ एक बदल करताना जेम्स पॅटिन्सनच्या जागी नाथन कुल्टरनाइला संघात स्थान दिले.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 5 बाद 148 धावा. (शुभमन गील 21, पॅट कमिन्स नाबाद 53, इयान मॉर्गन नाबाद 39, राहुल चहर 2-18, जसप्रीत बुमराह 1-22, ट्रेन्ट बोल्ट 1-32, नाथन कुल्टरनाइल 1-51).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.