लखनौ- उत्तर प्रदेशात दोन दिवसांपूर्वी न्यायालयात झालेल्या गोळीबारात गॅंगस्टर संजीव जीवा याची हत्या करण्यात आली. यात जीवा मारला गेला. तथापि, या घटनेशी किंवा गॅंगस्टरशी दुरान्वयेही संबंध नसलेली एक 18 महिन्यांची चिमुरडी गोळीबारात जखमी झाली आहे. एक गोळी तिच्या आईच्या हाताला स्पर्श करून गेली आणि तिच्या फुफ्फुसात शिरली आहे. ती गोळी अद्याप त्या मुलीच्या शरिरातच असून बाहेर काढता आलेली नाही. या मुलीला पाणीही त्यामुळे दिले गेलेले नाही.
लक्ष्मी असे त्या चिमुरडीचे नाव असून आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या मुलीची भेट घेतली आणि तिला चॉकलेटही दिले. त्यांनी गोळीबारात जखमी झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचीही विचारपूस केली. गोळीबार झाला त्या दिवशी जगदीश शर्मा, त्यांचा मुलगा सौरभ, सौरभची पत्नी नीलम आणि लक्ष्मी एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आले होते. त्याचवेळी गोळी लक्ष्मीला लागली आणि आता ती आत अडकली आहे. योगी आदित्यनाथ यांनी लक्ष्मीच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली आणि अगोदर मुलीची काळजी घ्या, खटल्याचे नंतर बघू असा दिलासा त्यांना दिला.
मुलीची एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर आहे. गरज भासली तर आणखी एक ऑपरेशन केले जाईल. मात्र गोळी काढलीच पाहिजे असेही काही नाही. काही त्रास नसेल तर गोळी काढणार नसल्याचे डॉक्टर संदीप तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, लक्ष्मीला ज्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे तेथे कडेकोट बंदोबस्त असून तिच्या आजीलाही आत सोडण्यात आले नव्हते. या प्रकारामुळे रूग्णालयात दाखल असलेल्या अन्य रूग्णांना आणि त्यांच्या नातलगांनाही अडचणींचा सामना करावा लागतो आहे.