वेगळ्याच कल्पनेचा अमृतवेल!

पुस्तकातली जादू त्या पुस्तकांच्या स्पर्शात आहे की त्यात लिहिलेल्या कथेत हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. पण छापील साहित्यात ठाम आत्म्याचा वावर भासतो. लेखकाचे मन तिथे सापडते नि अशाच धावपळीत दीडशे पानांची अमृतवेल माझ्या हाती पडते.

अमृतवेल यासाठी कारण वि. स. खांडेकर यांची ती कादंबरी. यापूर्वी केवळ कादंबरी म्हणजे जाडजूड पानं नि भव्यदिव्य इतिहास इतकीच ओळख असायची. पण मराठीचा व्याप मोठा आहे, त्यात या दिग्गज लेखकांच्या लेखणीने त्याची आर्तता पुरून उरणारी आहे. मराठीला कवेत घेण्याचे दिवस आले आहे, निसरडी झाली तिची पाळेमुळे तिला घट्ट धरून विश्‍वास देणं गरजेचं आहे, त्यासाठी बसच्या सिटावर बसून मराठी पुस्तके वाचून तिला आधार द्यायला हवाय. वेळ सार्थकी लागतो. पुस्तके आपल्याला नेहमीच काही ना काही देतात. खांडेकरांनी मला सहजच पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पोहोचताना प्रेमाचा सार दिला! त्यांनी प्रेमाचा हिशोब न मांडता, प्रेमाच्या भावनेचा न्याय केला. खरंच केला का न्याय?

प्रत्येक पुस्तकाप्रमाणे याही पुस्तकाने मला खुप काही दिलं. प्रेमाची निस्वार्थ व्याख्या म्हणजे अमृतवेल. लेखकाच्या लेखणीची लकब इतकी दीर्घ आहे कि प्रत्येक संवादाने अनेक प्रश्‍न मनात जन्म घेतात, जसं पुरुषाच मन हे नेमक काय अपेक्षा करत असेल?

केवळ स्त्रीप्रधान लिखाणाच्या घोळक्‍यात हे असे वरकरणी तुच्छ वाटणारे प्रश्‍न मूळ गाभ्यावर नेण्यास महत्त्वाचे ठरतात. कादंबरीतील देवदत्त त्याची काही काळासाठी झालेली प्रेयसी नंदा हिला तो विचारतो, तू माझ्यासाठी परत आलीस? प्रेमात ज्या प्रश्‍नांची उत्तरे ठाऊक असतात त्याची शाश्‍वती आपल्या जोडीदाराकडून घेण्यासारखा खट्याळ क्षण नसतो.

कारण विचारलेल्या प्रश्‍नांचा अर्थ म्हणजे, कुठेतरी यालाही तिचे येणं अपेक्षित होतं. पण जेव्हा ती स्वतःसाठी. माझ मन इथं गुंतलयं म्हणून असं उत्तर देते तेव्हा हा तिला वेडी ठरवत परत जाण्याचा मार्ग सुचवतो!

कदाचित त्याला समाजाची दुनियादारी माहित आहे, म्हणून तो बोलतो वगैरे वगैरे! कदाचित त्याला समाजाच्या व्याख्या आणि चौकटी माहिती आहे वगैरे वगैरे. पण त्या नंदाला माहित नाही असं नाहीच, पण कदाचित समाजाला तिच्या प्रेमाच्या डावातून तिने बाजूला सारलय!
तरीही प्रश्‍नांची मंडई वाढत जाते.

त्यानंतर कुतुहल खर तर वाढत जात मग प्रश्‍न पडतो, याचा शेवट खरोखरच योग्य होता का? एका निर्मळ शुद्ध प्रेमाच्या भावनेला भावा- बहिणीच्या बंधनात मिसळवायच. तेही हसत हसत?हसतच तिनें त्याला भाईसाहब म्हणायच आणि त्यानें नंदाताई! बस्स..?

भावनांच, एकत्र केलेल्या वचनांचं, क्षणांचे, शपथांचं काय? हे सगळ एवढ सोप्प असत? म्हणजे जितके क्षण सोबत होते ते जगायचे, तेही अर्धवट आणि त्यानंतर सगळ्याचा शेवट असा रक्षाबंधनला ओवाळणीत काय देऊ? असा करायचा? पण वास्तविक विचार करता वाटतं मग करणार काय दुुसरं.? दुसरा पर्याय होता त्यांच्याकडे? पळून जायचं होतं? कि मग समाजाला हे सांगायच होत कि नंदाच एका विवाहित परपुरुषावर प्रेम आहे आणि ते लग्न करु पाहताएत? खांडेकरांनी न्याय दिला की नाही हे त्या पात्रांच्या मनांवर अवलंबून! पण पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पत्र संपताना अनपेक्षित आनंद आणि पुस्तक संपतय हि खंतही होती. काही पुस्तक हृद्याला स्पर्श करतात अमृतवेल त्यापैकीच एक आहे.

-पूजा ढेरिंगे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)