माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे कुठे हनीमून सुरू ते शोधा : अमृता फडणवीस

मुंबई – “राज्याचे माजी गृहमंत्री असो किंवा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, त्यांचे कुठे हनीमून सुरू आहेत हे शोधून काढायला हवं. माध्यमांना जर ते कळलं तर तुम्ही त्याबाबात यंत्रणांना रिपोर्ट करा म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल,” अशी टीका महाविकास आघाडीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे.

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली असून यावेळी त्यांनी अनेक मुद्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, “राज्याचे माजी गृहमंत्री असो किंवा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, त्यांचे कुठे हनीमून सुरू आहेत हे शोधून काढायला हवं. माध्यमांना जर ते कळलं तर तुम्ही त्याबाबात यंत्रणांना रिपोर्ट करा म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल,”

“महाराष्ट्र प्रगतीत पुढे जावं की ड्रग्स कॅपिटल बनावं हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या तरूणांना तुरुंगात टाकलं जावं हा माझा वैयक्तिक विचार नाही, परंतु त्यांना त्यातून बाहेर काढायला नको का? त्यांच्यापर्यंत ड्रग्स येतात कुठून, त्याचं नेटवर्क याबाबत माहिती मिळाली पाहिजे. या मुलांच्या समुपदेशनाची आणि त्यांना सुधारगृहात ठेवण्याची गरज असते, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

“तुम्ही कामं तशी करत आहात म्हणून तुमच्यावर आरोप केले जात आहेत. तुम्ही भजन म्हणताय म्हणून तुमच्यावर आरोप केले जात नाहीत ना? जर तुम्ही जलयुक्त शिवारवर आरोप करू शकता, तर आम्ही समोर दिसतंय त्यावर आरोप करायचे नाही का?,” केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केला जात असलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.