प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 – राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) चाळीस घटक संस्थांमध्ये दिनांक 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 150 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
“डीईएस’चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी ही माहिती दिली. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, प्रबंधक डॉ. सविता केळकर यावेळी उपस्थित होते. “डीईएस’च्या संस्थापक दिनानिमित्त मंगळवारी फर्ग्युसन महाविद्यालयात मुख्य कार्यक्रम होणार आहे.
“डीईएस’चे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, माधव बल्लाळ नामजोशी, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, वामनराव आपटे यांच्या वंशजांचा सन्मान डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते बुधवारी (10 ऑगस्ट) टिळक रस्ता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी समाजाच्या विविध घटकांतील पन्नास हजार नागरिकांना राखी बांधण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ याच दिवशी करण्यात येणार आहे. “डीईएस’च्या विविध संस्थांतील 50 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान, फर्गसन महाविद्यालयात रक्षाबंधनानिमित्त “राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर अनुराधा प्रभुदेसाई यांचे गुरुवारी (11 ऑगस्ट) व्याख्यान होणार आहे.