एके दिवशी संत कबीर गावातून भजन करत फिरत असताना, त्यांनी एका स्त्रीला घराच्या ओसरीवर बसून जात्यावर दळण दळताना पाहिले. ती मूठ मूठ धान्य जात्यात टाकायची आणि उजव्या हातानी गरागरा जात फिरवून त्या दाण्याचे पीठ करायची, असं तिचे काम चालू होते.
ते फिरणारे जाते, दोन्ही पाळ्यातून भसाभसा खाली पडणारे पीठ, हे सारं दृष्य पाहताना एकाऐकी कबीर रडायला लागले. तिथे उभ्या असलेल्या लोकांना कबीरांनी भर रस्त्यात रडण्याचे कारण काय? तेच कुणाला कळेना. तेवढ्यात समोरून निपटनिरंजन नावाचे एक महात्मा आले. त्यांनीही कबीराला विचारले, “”काय बाबा! काय झाले? तू असा का आणि कशासाठी रडतो आहेस?” तेव्हा कबीर म्हणाले, “”महाराज! मला त्या जात्यात भरडून पीठ होणाऱ्या दाण्याकडे पाहून रडू येते आहे.”
त्यावर निपटनिरंजन म्हणाले, “”त्यात रडण्यासारखे काय आहे. जो दाणा जात्यात पडला आहे तो पिसला जाणारच, त्याचे पीठ होणारच. ते तर अटळच आहे.”
“”होय ना महाराज! या जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यासारखेच आपलेही जीवन आहे. मनुष्य प्राणीसुद्धा जन्म मरणाच्या जात्यात असाच भरडला जातोय. त्याचेही असेच पीठ होते आहे. यातून जीवाची सुटका कशी होणार? तो कसा वाचणार?”
तेव्हा कबीराला सोबत घेऊन ते महात्मा पुढे गेले. त्यांनी त्या बाईला विनंती केली. जात्याची वरची पाळी काढून जरा बाजूला करायला लावली. आणि म्हणाले, “”बघ कबीरा! नीट बघ. त्या जात्यात पडणारा दाणा हा भरडला जातो, हे खरं. पण जे दाणे जात्याच्या खुंट्याला धरून असतात, त्यांचे पीठ होत नाही. ते भरडले जात नाहीत. त्याप्रमाणेच जे जीव भगवंताच्या नामापाशी, जात्यातील खुंट्याच्या दाण्यांप्रमाणे चिटकून, नामस्मरणाला धरून असतात ते भरडले जात नाहीत. ते मात्र वाचतात. यातून काय समजायचे असेल ते समज आणि इतरांना समजवायचे असेल तर समजावून सांग.”
तोच बोध कबीरांनी स्वत:च्या मनाला लावून घेतला. आधी केले मग सांगितले, ह्या न्यायानी कबीरांनी आपल्या दोह्यातून, पदातून, साक्यातून तोच बोध साऱ्या जगाला दिला. बाबाहो! देवाचे नाम जपा. नामाच्या खुंट्याला कायम धरून राहा, त्यातच तुमचे कल्याण आहे.