अमृतकण : मी आहे ना..

अरुण गोखले

माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात, घटना घडतात, विचित्र वेळ येते की त्यावेळी तो अगदी हतबल होतो. निराधार होतो, निराश होतो.त्याला आपण अगदी एकटे आहोत असे जाणवते. अशा खचलेल्या, उन्मळून पडलेल्या निराशेने काळवंडलेल्या अवस्थेत त्याला जर चार आधाराचे, आश्‍वासनाचे कोणी तरी आपले आहे या दिलासाचे शब्द ऐकायला मिळाले, त्याच्या गालावरची ओघळणारी आसवे पुसून, त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवीत जर त्याला कोणी हे अभिवचन दिले की, बाबा रे काय झाले? तू असा हताश, निराश का झाला आहेस, का खचून गेला आहेस? हे बघ, असं घाबरू नकोस, भिऊ नकोस मी आहे ना.

तर त्या “मी आहे ना’ या आश्‍वासक शब्दांनीच त्याला पुनश्‍च उभे राहण्याचे बळ येते. त्याचा जाणारा तोल, संयम सावरला जातो. खचणारा आत्मविश्‍वास, संपू पाहणारी जीवन जगण्याची आशा पुन्हा एकवार जीव धरते. कारण, त्याला मिळालेलं असतं ते कोणीतरी माझं आहे, माझ्या मागे आहे.

मला सांभाळणारं आहे, हा विश्‍वास, हा दिलासा या आंतरिक बळाच्या सामर्थ्यावरच तो कोसळता कोसळता उभा राहतो. त्याला नैराश्‍याच्या काळोखातून आशेचा प्रकाश खुणावू लागतो. तो उठून पुन्हा उभा राहतो, प्रयत्नांची प्रामाणिक धडपड करू लागतो. कोणी तरी माझं आहे, या विश्‍वासाची, आश्‍वासक शब्दांची एक छोटीशी ज्योत त्याला नैराश्‍याच्या काळोखातून पुन्हा आशेच्या उजेडात आणते. काय असतं त्या शब्दांत! त्यात असतं विश्‍वासाचं बळ. त्यात असते संघर्षाची शक्‍ती. त्यात असते निराशेवर आशेने मात करण्याची कला.

बाळा! भिऊ नकोस मी आहे ना, या मातेच्या आश्‍वासक शब्दांवर विश्‍वास ठेवूनच लहान मूल अंधाऱ्या खोलीतही मोठ्या धिटाईने जाते. डॉक्‍टरांच्या याच आश्‍वासनाने रोग्यास मानसिक शक्‍ती प्राप्त होते.

तो मरणाच्या दारातूनही परत येतो. संसारतापाने पोळलेला जीवसुद्धा साधू, संत, सद्‌गुरूंच्या याच आश्‍वासक दिव्य शब्दामृत धारांनी निवतो. त्याचे चंचलमन सुस्थिर होते. माझा पाठीराखा माझ्या मागे आहे, तो आहे ना? मग मी चिंता करण्याचे कारणच काय? हा त्याच्या मनातला विश्‍वास बळावतो आणि एकदा का ही भावना बळावली की, तो आपोआपच चिंता न करता खऱ्या अर्थाने माझा कोण, याचे चिंतन करू लागतो. तिथेच त्याची परमार्थाची वाटचाल चालू होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.