Rohit Patil On Devendra Fadnavis | मुंबईत सुरू असलेल्या विशेष तीन दिवसीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून भाजप नेते राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती झाली आहे.
यानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतोद रोहित पाटील यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सर्वात तरुण आमदार म्हणून पहिल्यांदाच भाषण केलं. त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं.
राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील म्हणाले की, “तुम्ही ज्याप्रकारे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकावलेला आहे, त्याचप्रकारे मी सर्वात तरुण सदस्य म्हणून या सभागृहात बसण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळ सदस्याकडे लक्ष असावं अशी विनंती मी तुम्हाला करतो.”
“तुमचं माझ्याकडे लक्ष असावं याचं दुसरं कारण म्हणजे तुम्ही एक निष्णात वकील आहात. मी देखील वकिली पूर्ण करत आहे. एक नंबर बाकावर बसलेल्या वकिलाकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे असू दे, सर्वसामान्य लोकांच्या हिताचं आवाज याकडे तुम्ही लक्ष द्या अशीही विनंती मी आपल्याला करतो,” असं रोहित पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचे खास पद्धतीने अभिनंदन
यावेळी रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही एका खास पद्धतीने अभिनंदन केले. “देवेंद्र फडणवीस यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता संतांच्या वाणीतूनही आपलं नाव इतक्या गोड पद्धतीनं घेतलं गेलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात करत असताना तुम्ही विरोधी पक्षांना गोड पद्धतीची वागणूक द्याल.”
“अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हटले. कारण पुराणातसुद्धा अमृताला वेगळं महत्त्व होतं आणि आजही आहे. विरोधी पक्षालासुद्धा तुम्ही सहकार्य कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो,” असं पाटील यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचं नाव अमृता असल्याने यावेळी त्यांनाही हसू आल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा: