‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’असा संदेश देत अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; गाणे सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे.  आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांनी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गणरायाच्या आगमनासाठी त्यांनी ‘गणेश वंदना’ हे गाणे गायिले असून एक अनोखा संदेश दिला आहे.

‘गणेश वंदना’ या ४ मिनिटे ४९ सेकंदाच्या गाण्यात अमृता यांनी एका कुटुंबातील स्त्रीची भूमिका साकारली आहे. ती स्त्री एक डॉक्टर आहे. या स्त्रीच्या कुटुंबात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहात बाप्पाचे स्वागत करत असतात. एककीडे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते तर दुसरीकडे त्या स्त्रीला डॉक्टर असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये तातडीने बोलवण्यात येते.

ती स्त्री घरातील जबाबदारी पार पाडून आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होते. तिच्या कुटुंबातील लोकांचाही तिला यासाठी पाठिंबा असल्याचे गाण्यात दाखवण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चर्चेत आहे.

अमृता फडणवीस यांनी ‘गणेश वंदना’ हे गाणे सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना समर्पित केले आहे. ‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’ असे त्यांनी या गाण्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमृता यांनी हे गाणे गायिले असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना कोणताही सण, उत्सव असो समाजप्रतीची त्यांची कर्तव्ये पार पाडावी लागतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.