धुळे, दि. 5 – धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल यांनी आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली आहे. अमरिश पटेल यांना 332, तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मते मिळाली. यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली.
या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे अमरिश पटेल यांनी भाजपची मतं तर मिळवलीच. मात्र कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मते फुटली. जर आकड्यातच बोलायचे झाल्यास भाजपाचे 199, तर महाविकास आघाडीचे 213 इतकी मते होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला आणि भाजपाचे अमरिश पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, यावर अशोक चव्हाण म्हणाले, भाजपने मिळवलेला विजय हा दुसऱ्याच्या घरात चोरी करून मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचे असाच प्रकार भाजप करत आहे. भाजपने ही चोरी केली आहे. आम्हाला 5 जागांपैकी अनेक जागा मिळतील. तसेच आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्षे हे सरकार टिकेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये सहभागी झालेल्या अमरीश पटेल यांच्यामुळे झालेल्या फुटीवरही भाष्य केले.
धुळे-नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ
भाजप -199
कॉंग्रेस – 157
राष्ट्रवादी – 36
शिवसेना -22
एमआयएम – 9
समाजवादी पार्टी – 4
बहुजन समाज पार्टी – 1
मनसे – 1
अपक्ष – 10