“मी आधीच सांगितलं होत…” – सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंग यांचे पक्षनेतृत्वाला उद्देशून ट्विट

चंदीगड – पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला पक्षांतर्गत कलह मिटण्याचे नाव घेत नाहीये. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय खळबळ माजवली आहे. अमरिंदर सिंग – सिद्धू यांच्यातील प्रदीर्घ लढ्यानंतर पक्षनेतृत्वाने अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी चरणजित सिंग चन्नी यांना बढती दिली आहे. सिद्धू यांच्या रेट्यामुळेच अमरिंदर यांना पायउतार व्हावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच सिद्धू यांनीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे.

सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं होत. ते (सिद्धू) स्थिर राहू शकत नाहीत. त्यांच्या याच  स्वभावामुळे ते पंजाबसारख्या सीमेवर वसलेल्या राज्यासाठी योग्य नाहीत.” असं ट्विट अमरिंदर सिंग यांनी पक्षनेतृत्वाला उद्देशून केलं आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षनेतृत्वाने काही महिन्यांपूर्वीच सिद्धू यांच्याकडे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले होते. तसेच दोन्ही नेत्यांतील वाद मिटला असल्याचं राहुल गांधी यांनी जाहीर केलं होत. मात्र यानंतर देखील सिद्धू व अमरिंदर सिंग यांच्यात खटके उडत होते.

अखेर पक्षनेतृत्वाने अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेत चाणजित सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. अशातच आज सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.