अमरावती : अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा प्रशासनाने हटविल्यापासून अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आक्रमक आहेत. यावरून राजकारण होत असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यातच आज अमरावती महापालिका आयुक्तांवर शाईफेक कऱण्यात आली आहे.
अमरावतीचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर काही महिलांकडून शाईहल्ला करण्यात आला. यावेळी आयुक्त आष्टीकर यांना धक्काबुक्की करत पुतळा का हटवला याचा जाबही महिलांनी विचारला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे डॉ. आष्टीकर यांची सुटका करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी 12 डिसेंबर 2021 रोजी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यानंतर 16 डिसेंरला तो पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यातूनच आयुक्तांवर शाईफेक झाल्याचं समजत.
दरम्यान, आयुक्तांवर शाई फेकली त्यांच्या पाठिशी आपण रहाणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोपही नवनीत राण यांनी केला आहे.